Bank Strike: 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी ला बँकांचा देशव्यापी संप; ऑनलाईन सेवा मात्र राहणार सुरु
आज आणि उद्या असे दोन दिवस हा संप असणार आहे
देशामध्ये भारतीय बॅंक महासंघ (IBA) सोबत पगारवाढी (Salary Hike) बाबत सुरू असलेल्या वाटाघाटी असफल ठरल्याने आज 31 जानेवारी रोजी बॅंक कर्मचार्यांच्या संघटनांकडून संप पुकारण्यात आला आहे. आज आणि उद्या असे दोन दिवस हा संप असणार आहे तर 2 फेब्रुवारी रोजी साप्ताहिक सुट्टी रविवार असल्याने सलग तीन दिवस बँका बंद (Bank Employee Strike) राहणार असल्याचे समजतेय. अशा वेळी बॅन व्यवहाराची संपूर्ण भिस्त ही ऑनलाईन बँकिंग सुविधेवर आहे. बँक कर्मचारी संघटनांची मध्यवर्ती संघटना असलेल्या युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स आणि इंडियन बँक्स असोसिएशन यांच्यात वेतन सुधारणेच्या प्रलंबित मागणीवर गुरुवारी कोणतीही सहमती न झाल्यामुळे संपाचा निर्णय घेण्यात आला आहे. ( शहरी सहकारी बँकांमध्ये 5 वर्षांमध्ये तब्बल 220 कोटी रुपयांचा घोटाळा: आरबीआय)
प्राप्त माहितीनुसार, सध्या IBA कडून 12.25% वाढ दिली जात आहे परंतु UFBU कडून 15% पगारवाढीची मागणी आहे. बँकांच्या युनायटेड फोरमने वेतन सुधारणेची प्रमुख मागणी आयबीएकडे केली होती. नोव्हेंबर 2017 पासून ही मागणी प्रलंबित आहे. अद्याप या मागणीवर समाधानकारक तोडगा न निघाल्याने अखेरीस बँक संघटनांनी हे संपाचे हत्यार उपसल्याचे सांगितले जात आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया सहित अन्य बँकांनी या संपाविषयी ग्राहकांना गुरुवारी माहिती दिली. सलग दोन दिवस चालणाऱ्या या संपामुळे कामकाजावर परिणाम होईल, असे या बँकांनी ग्राहकांना सांगितले आहे.
दरम्यान, शनिवारी, 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प असून त्या दिवशी सर्व सरकारी बँका संपावर असतील. यापुढे पगारवाढीच्या मागणीवर वेळेत तोडगा न निघल्यास 1 एप्रिल पासून बेमुदत संप करण्याचा इशाराही बॅंक संघटनांनी दिला आहे.