Bangladesh 50th Independence Day: शेख हसिना यांच्या निमंत्रणाचा स्वीकार, बांगलादेशच्या 50 व्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यात PM Narendra Modi होणार सहभागी, Coronavirus महामारीनंतरचा पहिलाच परदेश दौरा

ते म्हणतात, ‘महामहीम पंतप्रधान शेख हसीना यांच्या निमंत्रणावरून मी 26-27 मार्च 2021 रोजी बांगलादेश दौऱ्यावर जात आहे. मला आनंद झाला आहे कारण कोविड-19 महामारी सुरु झाल्यानंतर हा माझा पहिलाच परदेश दौरा आपल्या मित्र देशाचा आहे

File image of PM Narendra Modi (Photo Credits: PIB)

26 मार्च 1971 मध्ये बांगलादेशचे स्वातंत्र्य (Bangladesh Independence) जाहीर करण्यात आले आणि मुक्तीयुद्ध सुरू झाले. पूर्व बंगालमधील सर्व घटकांना पाकिस्तानी सैन्याच्या राज्यकर्त्याच्या अथक छळापासून वाचवण्यासाठी, भारताने बांगलादेश युद्धामध्ये साथ दिली होती. या स्वातंत्र्य युद्धाच्या नऊ महिन्यांत मानवी जीवनाच्या बाबतीत पाकिस्तानी लष्कराला 30 लाखांचे नुकसान झाले होते. शेवटी त्याच वर्षी 16 डिसेंबर रोजी बांगलादेशने विजय मिळविला, जो विजय दिन म्हणून साजरा केला जातो. बांगलादेशला पाकिस्तानपासून स्वतंत्र होऊन यंदा 50 वर्षे पूर्ण होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक जागतिक नेते आणि नेपाळ, श्रीलंका, भूतान आणि मालदीव या देशांचे प्रमुख हे स्वातंत्र्याच्या 50 व्या व्या वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

बांगलादेश दौर्‍यावर रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले निवेदन दिले आहे. ते म्हणतात, ‘महामहीम पंतप्रधान शेख हसीना यांच्या निमंत्रणावरून  मी 26-27 मार्च 2021 रोजी बांगलादेश दौऱ्यावर जात आहे. मला आनंद झाला आहे कारण कोविड-19 महामारी सुरु झाल्यानंतर हा माझा पहिलाच परदेश दौरा आपल्या मित्र देशाचा आहे, ज्याच्याशी भारताचे दृढ सांस्कृतिक, भाषिक आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत.’

‘उद्याच्या राष्ट्रीय दिन सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी मी उत्सुक आहे. बांगलादेशचे राष्ट्रपिता बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांची जन्मशताब्दीदेखील यानिमित्ताने साजरी केली जाणार आहे. बंगबंधू हे गेल्या शतकातील एक महान  नेते होते, ज्यांचे जीवन आणि आदर्श लाखो लोकांना आजही प्रेरणा देत आहेत. मी त्यांच्या स्मृतींना श्रद्धांजली वाहण्यासाठी तुंगिपारामध्ये बंगबंधूंच्या समाधीला भेट देण्यास उत्सुक आहे.’

‘मी पुराण परंपरेतील 51 शक्तीपीठांपैकी एक असलेल्या प्राचीन जशोरेश्वरी काली मंदिरात काली देवीची प्रार्थना करण्याची मी आतुरतेने वाट पाहत आहे. ओरकंदी येथील मातुआ समुदायाच्या प्रतिनिधींबरोबर संवाद साधण्यासाठी मी विशेष उत्सुक आहे. इथूनच श्री श्री हरिचंद्र ठाकूरजींनी आपल्या पवित्र संदेशाचा प्रसार केला होता. (हेही वाचा: 76 किलोच्या बॉम्बने पंतप्रधान Sheikh Hasina यांच्या हत्येचा कट; 14 दहशतवाद्यांना सुनावली फाशीची शिक्षा)

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या यशस्वी व्हर्चुअल बैठकीनंतर मी पंतप्रधान शेख हसीना यांच्याबरोबर व्यापक चर्चा करणार आहे. महामहिम राष्ट्रपती अब्दुल हमीद यांना भेटण्यासाठी तसेच इतर बांगलादेशी मान्यवरांशी संवाद साधण्यासाठी मी उत्सुक आहे.’

‘माझा दौरा हा केवळ पंतप्रधान शेख हसीना यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली बांगलादेशच्या उल्लेखनीय आर्थिक आणि विकासाच्या प्रगतीचे  कौतुक करण्यासाठी नाही, तर या यशासाठी भारताचा कायम पाठिंबा दर्शवण्यासाठी देखील आहे.  कोविड-19 च्या विरोधात बांगलादेशच्या लढाईला मी भारताचे समर्थन आणि एकजुटता देखील व्यक्त करणार आहे.’

दरम्यान, 26 मार्च रोजी बांगलादेशचा स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. हा दिवस बांगलादेशात राष्ट्रीय सुट्टीचा दिवस आहे. यानिमित्ताने बांगलादेशात स्वातंत्र्यदिन परेड, राजकीय भाषण, मेळावे, बांगलादेशच्या परंपरेवर आधारित संगीत महोत्सव असे कार्यक्रम असतात. बंगबंधू म्हणून प्रसिद्ध असलेल्या शेख मुजीबुर्रहमान यांनी 25 मार्च 1971 च्या मध्यरात्रीनंतर पाकिस्तानापासून बांगलादेशचे स्वातंत्र्य घोषित केले आणि त्यानंतर त्यांना पाकिस्तानी सैन्याने अटक केली. 26 मार्च 1971 रोजी बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या घोषणेने मुक्तियुद्ध सुरू झाले.