Ayushman Bharat: आता 70 पेक्षा जास्त वयाच्या वृद्धांना 5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत; PM Modi यांनी सादर केली AB PMJAY योजना, जाणून घ्या सविस्तर
या योजनेअंतर्गत सर्व वृद्धांना आयुष्मान वय वंदना कार्ड दिले जाईल.
Ayushman Bharat: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी धन्वंतरी जयंती आणि 9व्या आयुर्वेद दिनानिमित्त, 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठांना खास भेट दिली आहे. त्यांनी आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना (AB PM-JAY) अंतर्गत सर्व ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य विमा संरक्षण देण्यास सुरुवात केली आहे. या योजनेंतर्गत 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व वृद्धांना, त्यांचे उत्पन्न कितीही असो, 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत. या योजनेद्वारे, आरोग्य सेवा सर्वांसाठी सुलभ आणि परवडणारी बनविण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. कोणत्याही राष्ट्राची प्रगती थेट तेथील नागरिकांच्या आरोग्यावर अवलंबून असते हे लक्षात घेऊन, पंतप्रधानांनी देशातील नागरिकांच्या आरोग्यासाठी सरकारचे प्राधान्य ठळक केले
गेल्या महिन्यातच ही योजना जाहीर करण्यात आली होती. पीआयबीच्या सोशल मीडिया अकाउंटवर दिलेल्या माहितीनुसार ही योजना सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी, 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांसह सुलभ आणि परवडणारी आरोग्यसेवा सुनिश्चित करते. या योजनेअंतर्गत सर्व वृद्धांना आयुष्मान वय वंदना कार्ड दिले जाईल. या आयुष्मान योजनेच्या विस्ताराबद्दल समाधान व्यक्त करून पीएम मोदी म्हणाले की, प्रत्येक वृद्ध व्यक्ती या योजनेसाठी उत्सुक आहे. आपण तिसऱ्यांदा निवडून आल्यास, 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व वृद्धांना आयुष्मान योजनेत आणण्याची निवडणूक हमी पूर्ण केली जात आहे.
आयुष्मान वय वंदना कार्डद्वारे देशातील 70 वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला रुग्णालयात मोफत उपचार मिळणार आहेत. पीएम मोदी म्हणाले, हे कार्ड सार्वत्रिक आहे आणि त्याला कोणत्याही उत्पन्नाची मर्यादा नाही, मग ते गरीब असो वा मध्यमवर्गीय किंवा उच्च वर्ग. ही योजना सार्वत्रिक कव्हरेजसाठी मैलाचा दगड ठरेल. आयुष्मान भारत विस्तारित योजना सुरू केल्याने, सुमारे 4.5 कोटी कुटुंबांतील सुमारे 6 कोटी सदस्यांना लाभ होणार आहे. (हेही वाचा: Medical Equipment आयातीवर प्रतिबंध लावा, वैद्यकीय उपकरण उद्योगाची केंद्र सरकारला विनंती)
आधार कार्डमध्ये नोंदवलेल्या वयानुसार, 70 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची कोणतीही व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र असेल. यासाठी PMJAY पोर्टल किंवा आयुष्मान ॲपवर नोंदणी करावी लागेल. ज्यांच्याकडे आधीच आयुष्मान कार्ड आहे त्यांना पोर्टल किंवा ॲपवर पुन्हा अर्ज करावा लागेल आणि नवीन कार्डसाठी त्यांचे eKYC पूर्ण करावे लागेल. जे ज्येष्ठ नागरिक 70 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत आणि AB PM-JAY अंतर्गत आधीच समाविष्ट असलेल्या कुटुंबांचे सदस्य आहेत, त्यांना स्वतःसाठी प्रति वर्ष 5 लाखांपर्यंत अतिरिक्त टॉप-अप कव्हरेज मिळेल.