Ayodhya Ram Temple: राम मंदिर बांधण्यासाठी 'अशोक वाटिका'मधील शिळेचा होणार उपयोग; श्रीलंकेवरून आणला जात आहे दगड
याच भावनेने श्रीलंकेच्या अशोक वाटिका येथील सीता एलिया (Sita Eliya) ची शिळा राम मंदिराच्या बांधकामात वापरली जाणार आहे
अयोध्येत (Ayodhya) भव्य राम मंदिराचे (Ram Janmabhoomi Temple) बांधकाम सुरू झाले असून, राम मंदिरामध्ये माता सीतेला विशेष स्थान देण्यात येणार आहे. याच भावनेने श्रीलंकेच्या अशोक वाटिका येथील सीता एलिया (Sita Eliya) ची शिळा राम मंदिराच्या बांधकामात वापरली जाणार आहे. अशोक वाटिका ही ती जागा आहे जिथे आई सीतेला रावणाने कैद करून ठेवले होते. हा दगड भारतातील श्रीलंकेचे राजदूत मिलिंदा मरागोडा यांच्याकडे देण्यात आला आहे, आता हा पवित्र दगड भारतात आणला जाईल. अयोध्येत राम मंदिर बांधताना एका योग्य जागी या श्रीलंकेमधील सीता एलियाच्या दगडाचा वापर केला जाईल.
मान्यतेनुसार, सीता एलिया ही ती जागा आहे जेथे देवी सीतेला रावणाने आपल्या राजधानीमधील नयनरम्य बागेत 11 महिने बंदिवान म्हणून ठेवले होते. तीन पर्वतांपैकी असणाऱ्या एका पर्वतावरील हा सीता एलियाचा दगड श्रीलंकेच्या उच्च न्यायालयामार्फत सध्याचे श्रीलंकेचे राजदूत मिलिंदा मोरागोडा यांच्याद्वारे भारतात आणला जाईल. लोकांचे असे मानने आहे की, माता सीतेला अशोक वृक्षांनी सुशोभित केलेल्या एका सुंदर बागेत ठेवले होते. याठिकाणी नागच्या फनाच्या आकाराची गुफा आणि जवळच एक सुंदर धबधबा आहे, यालाच सीता एलिया वाटिका म्हणतात. सध्या या ठिकाणी श्री राम जानकीचे एक सुंदर मंदिर आहे. हे मंदिर सीता अम्मान कोविल म्हणून ओळखले जाते.
असे म्हणतात की आजही सीता एलियामध्ये भगवान हनुमानाच्या पावलांचे ठसे आहेत. या बरोबरच या ठिकाणी माता सीता, भगवान श्री राम आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती ठेवल्या आहेत. आजही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अशोक वृक्ष अस्तित्त्वात आहेत व म्हणूनच हा भाग अशोक वाटिका म्हणून ओळखला जात असे.