Ayodhya Deepotsav 2024: अयोध्येत यंदाच्या दिवाळीत 30 हजारांहून अधिक स्वयंसेवक प्रज्वलित करणार 28 लाख दिवे; होणार नवा विश्वविक्रम

दिवे प्रज्वलनाबाबतच्या विक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी यासाठी त्यांच्या एका टीमलाही आमंत्रित करण्यात आले आहे. हे दिवे छोटी दिवाळी (30 ऑक्टोबर 2024) रोजी प्रज्वलित होतील.

Deepotsav (Photo Credits: IANS)

Ayodhya Deepotsav 2024: अयोध्येतील नव्याने बांधलेले राम मंदिर (Ayodhya Ram Mandir) भाविकांसाठी खुले झाल्यानंतर 2024 मध्ये पहिली दिवाळी (Diwali 2024) साजरी केली जाईल. अयोध्येत दिवाळीची तयारी सुरू झाली आहे. या दिवाळीच्या आयोजनासाठी सरकारने विशेष योजना आखली आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेकनंतर या ठिकाणी तब्बल 28 लाख दिवे प्रज्वलित होणार आहेत. अशाप्रकारे 2024 च्या दिवाळीत अयोध्येत नवा विक्रम होणार आहे. या दिवशी सरयू घाट आणि मंदिरासह अयोध्येतील इतर ठिकाणी 28 लाख दिवे प्रज्वलित केले जाणार आगेत. अवध विद्यापीठाच्या सुमारे 30 हजार स्वयंसेवकांनी दीपोत्सवाच्या ठिकाणी 28 लाख दिवे लावण्याचे काम सुरू केले आहे. दिवे लावण्याचे काम धनत्रयोदशीपूर्वी, 29 ऑक्टोबर 2024 पर्यंत पूर्ण होईल.

अयोध्येतील 55 घाटांवर हे दिवे लावण्यात आले आहेत. दिवे प्रज्वलनाबाबतच्या विक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी यासाठी त्यांच्या एका टीमलाही आमंत्रित करण्यात आले आहे. हे दिवे छोटी दिवाळी (30 ऑक्टोबर 2024) रोजी प्रज्वलित होतील.

या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या स्वयंसेवकांचे म्हणणे आहे की, प्राणप्रतिष्ठा नंतरची पहिली दिवाळी भव्य करण्यासाठी ते कोणतीही कसर सोडणार नाहीत. अयोध्येत प्रज्वलित होणाऱ्या दिव्यांसाठी 92 हजार लिटर मोहरीचे तेल वापरण्यात येणार आहे. हे तेल अयोध्येत पोहोचले आहे. अयोध्येत या दिव्यांवर नजर ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन आणि सुरक्षा दलही तैनात करण्यात आले आहेत. घाटांव्यतिरिक्त मंदिर परिसरातही दिवे लावण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्य प्रांगणासाठीही विविध प्रकारचे दिवे लावण्यात आले आहेत. (हेही वाचा: World Record In Nagpur: दिवाळीच्या मुहूर्तावर प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर करणार 24 तासात 10 हजार डोसे बनवण्याचा विश्वविक्रम)

मंदिराच्या आत लावण्यात येणारे दिवे काजळी आणि धूर सोडणार नाहीत. यामुळे मंदिराच्या भिंती आणि दगडांवर खुणा आणि डाग पडणार नाहीत. हे दिवे मेणाचे असणार आहेत. मंदिराच्या गर्भगृहासाठी विविध प्रकारचे दिवे बनवण्यात आले आहेत. हे दिवे हत्तीच्या आकाराचे आहेत, जे देसी तुपाने जाळले जातील. गर्भगृहाव्यतिरिक्त मंदिर परिसरातही 1 लाख दिवे प्रज्वलित करण्यात येणार आहेत. मंदिरात दिव्यांशिवाय फुलांची सजावटही करण्यात आली आहे. यासोबतच मंदिराच्या चारही प्रवेशद्वारांवर कमानी बांधण्यात आल्या आहेत. 29 ऑक्टोबरपासून पुढील 4 दिवस मंदिर खुले ठेवण्यात येणार आहे.