Himanta Biswa Sarma: फरार आरोपींना पोलीसांनी गोळ्या घालाव्यात, असमचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांचे धक्कादायक विधान

त्यांनी असे ठरवले असले तरी त्यांनी याबाबत जे वक्तव्य केले आहे त्यावरुन आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Himanta Biswa Sarma | (Photo Credit : Facebook)

असम राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी गुन्हे आणि गुन्हेगारांबाबत कडक धोरण अवलंबिण्याचे ठरवल्याचे दिसते. त्यांनी असे ठरवले असले तरी त्यांनी याबाबत जे वक्तव्य केले आहे त्यावरुन आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच ते आपल्या वक्तव्यामुळे चर्चा आणि टीकेचेही धनी बनले आहेत. गुन्हेगारांविरोधात कठोर पावले उचलण्याबाबत पोलीसांना आणि अधिकाऱ्यांना सरमा यांनी सक्त आदेश दिले आहेत. दरम्यान, त्यांनी म्हटले आहे की, पोलिसांच्या ताब्यात असलेल्या गुन्हेगारांकडून पळून जाण्याचा प्रयत्न होत असेल तर, चकमक 'पॅटर्न असायला पाहिजे.' त्यांना गोळ्या घालायला पाहिजेत. अर्थात छातीमध्ये नव्हे. असम राज्यात नुकत्याच झालेल्या एका चकमकीचे त्यांनी समर्थन केले आहे. राज्यात सोमवारी एका महिलेसोबत घडलेल्या गुन्हे प्रकरणात जीरो टॉलरेंस (Zero-tolerance) निती अवलंबण्यासोबत इतर गोष्टींबाबतही भाष्य केले.

मुख्यमंत्री हिमांता बिस्वा सरमा यांनी म्हटले आहे की, हत्या, बलात्कार, ड्रग्ज, खंडणी आणि अवैधरित्या शस्त्रांसह सर्व प्रकरणांतील आरोपींवर तपास करुन पुढच्या सहा महिन्यांमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात यावे. जर काही आवश्यकता अधिक मदत आवश्यक असेल तर आपल्या वरिष्ठ अधिकारी, प्रांताचे डीआयजी यांच्याशी संपर्क करा. (हेही वाचा, Assam: मास्क घालण्याची गरज नाही, कोरोना विषाणू निघून गेला आहे, जेव्हा तो परत येईल तेव्हा कल्पना देऊ: आरोग्यमंत्री Himanta Biswa Sarma )

वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, सरमा यांनी म्हटले की, जर कोणी आरोपी पोलिसांचे पिस्तूल हिसकावत असेल आणि पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्याचा प्रयत्न करत असेल किंवा पळून जाण्याचा प्रयत्न करत असेल किंवा तो बलात्कारी असेल तर कायदा अशा लोकांना गोळ्या घालण्याचे आदेश देतो. जर मला कोणी विचारले राज्यात चकमकीचा पॅटर्न बनला आहे तर मी म्हणतो की, जर आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्याचा प्रयत्न करत असेल तर चकमक पॅटर्न असायला पाहिजे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना सरमा यांनी म्हटले की, पोलिसंकडे शूटआउटचा कोणताही अधिकार नाही. त्यांनी कायद्याचे पालन करुन गुन्हेगारांचा सामना करायला पाहिजे. परंतू, अशा प्रकारची चकमक (शूटआऊट) तेव्हा होते जेव्हा पोलिसांकडे काही पर्यायच राहात नाही. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार राज्यात मे महिन्यानंत कमीत कमी 12 संशयीत अतिरेकी आणि गुन्हेगार चकमकीत मारले गेले आहेत. मारले गेलेले आरोपी हे पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे पोलिसांचे म्हणने आहे.