Amazon India कडून यंदा सणांच्या दिवसांत उघडणार रोजगाराच्या दीड लाखांपेक्षा जास्त नव्या संधींचं दार

आगामी सणासुदीच्या काळाच्या पार्श्वभूमीवर अॅमेझॉन इंडियाने आपल्या ऑपरेशन्स नेटवर्कमध्ये १,६०,००० हून अधिक हंगामी रोजगार संधी निर्माण केल्या आहेत. यात देशभरातील ४०० हून अधिक शहरांचा समावेश असून, हजारो महिला आणि दिव्यांग कर्मचाऱ्यांनाही यात सामावून घेतले जात आहे.

Amazon (PC - Pixabay)

आगामी सणासुदीच्या काळाच्या पार्श्वभूमीवर अ‍ॅमेझॉन इंडियाने (Amazon India) आपल्या ई-कॉमर्स आणि क्विक कॉमर्स व्यवसायाला पाठिंबा देणाऱ्या संपूर्ण भारतातील ऑपरेशन्स नेटवर्कमध्ये १,६०,००० हून अधिक हंगामी रोजगार संधी निर्माण केल्याचे जाहीर केले आहे. यामध्ये देशभरातील ४०० हून अधिक शहरांमधील प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार संधींचा समावेश आहे.

कोणत्या शहरांत संधी

मोठ्या महानगरांव्यतिरिक्त वाराणसी, कोची, जालंधर, गाझियाबाद, रांची, सालेम, गोरखपूर यांसारख्या द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या शहरांमध्येही या रोजगार संधी निर्माण करण्यात आल्या आहेत. काही मिनिटांत जलद आणि विश्वासार्ह वितरण करण्यासाठी विस्तारणाऱ्या अ‍ॅमेझॉन  नाऊ नेटवर्कमध्येही हजारो रोजगार संधी निर्माण झाल्या आहेत.

महिला आणि दिव्यांगांना प्राधान्य

सणासुदीच्या काळासाठी अ‍ॅमेझॉनच्या विस्तारित कर्मचारीवर्गात हजारो महिला आणि दिव्यांग कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. नवीन कर्मचारी सध्याच्या ऑपरेशन्स नेटवर्कमध्ये सामील होऊन ग्राहकांच्या ऑर्डर्सचे पिक-अप, पॅकिंग, शिपिंग आणि डिलिव्हरी सुरक्षितपणे हाताळण्यास मदत करतील. यातील बहुतांश कर्मचाऱ्यांना आधीच ऑनबोर्ड करून प्रशिक्षण देण्यासही सुरुवात झाली आहे.

कर्मचारी कल्याणासाठी उपक्रम

हंगामी कर्मचाऱ्यांनाही इतर सहकाऱ्यांप्रमाणे सुरक्षा आणि कल्याणकारी लाभ मिळणार आहेत. यामध्ये सुरक्षित व सर्वसमावेशक कार्यस्थळ, आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा यांसारख्या लाभांचा समावेश आहे. कंपनीच्या समृद्धी उपक्रमाद्वारे नवीन सहकाऱ्यांना ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी आणि इतर सरकारी कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठीही मदत केली जाणार आहे.

अ‍ॅमेझॉन  इंडिया, एपीएसी, मिडल ईस्ट, आफ्रिका आणि तुर्कीचे ऑपरेशन्सचे उपाध्यक्ष अभिनव सिंग यांनी सांगितले की, ग्राहकांच्या वाढत्या मागणीनुसार जलद व विश्वासार्ह वितरण देण्यासाठी ही रोजगारनिर्मिती करण्यात आली असून, महिला आणि दिव्यांगांसाठी संधी उपलब्ध करून देणारा सर्वसमावेशक कर्मचारीवर्ग तयार करण्यावर कंपनीचा भर आहे.

अ‍ॅमेझॉनचे नेटवर्क

अ‍ॅमेझॉन इंडियाने देशभरात मजबूत फुलफिलमेंट आणि डिलिव्हरी नेटवर्क उभे केले असून, याद्वारे १.७ दशलक्षहून अधिक विक्रेत्यांना सेवा दिली जाते. कंपनीकडे १५ राज्यांमध्ये फुलफिलमेंट सेंटर्स असून ती ४३ दशलक्ष घन फुटांहून अधिक साठवण जागा उपलब्ध करून देतात. याशिवाय १९ राज्यांमध्ये सॉर्टेशन सेंटर्स, जवळपास २,००० अ‍ॅमेझॉन-संचालित व भागीदार डिलिव्हरी स्टेशन्स आणि २८,००० हब डिलिव्हरी सहयोगी कार्यरत आहेत.

डिलिव्हरी कर्मचाऱ्यांसाठी विशेष लाभ

अ‍ॅमेझॉनने आपल्या लॉजिस्टिक्स नेटवर्कमधील हजारो डिलिव्हरी कर्मचाऱ्यांसाठी 'सन्मान' हा कल्याणकारी उपक्रम सुरू केला असून, यामध्ये मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, विमा संरक्षण आणि रस्ते सुरक्षा उपाययोजनांचा समावेश आहे. यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला कंपनीने जवळपास ९०,००० डिलिव्हरी कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य व विमा लाभांचाही विस्तार केला होता.

दिल्ली-एनसीआर, मुंबई, बेंगळुरू आणि चेन्नईमध्ये सध्या कार्यरत असलेल्या वातानुकूलित विश्रामगृहांच्या (आश्रय केंद्रे) नेटवर्कचा विस्तार करत २०२६ अखेरपर्यंत ते २५० केंद्रांपर्यंत नेण्याची कंपनीची योजना आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement