Amarnath Yatra: अमरनाथ यात्रेकरुचा 300 फूट खोल दरीत कोसळून मृत्यू

तर त्याच्यासोबत असलेली आणखी एक महिला भाविक जखमी झाली.

Amarnath Yatra | (Photo Credit - Twitter)

अमरनाथ यात्र करुन परतत असताना एका भाविकाचा 300 फूट खोल दरीत कोसळून मृत्यू झाला आहे. हा यात्रेकरु अमरनाथ गुहेतून (Amarnath Cave) परतत होता दरम्यान, कालीमाता जवळील वाटेने जाताना तो घसरला आणि खोल दरीत कोसळला. ज्यात त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती जम्मू-कश्मीर पोलिसांनी (Jammu and Kashmir Police) दिली आहे. विजय कुमार शाह असे मृताचे नाव असून तो बिहारमधील रोहतास जिल्ह्यातील (Rohtas District of Bihar) तुंबा गावचा रहिवासी होता.

जम्मू-कश्मीर पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, दरीत कोसळून ठार झालेल्या भाविकाचे विजय कुमार शाह असे नाव आहे. तो मुळचा बिहार राज्यातील रोहतास जिल्ह्यातील रहिवासी आहे. ममता कुमारी नामक आपल्या सहभाविकेसोबत तो गुहेतून परत होता. दरम्यान, घसरल्याे त्याचा तोल गेला आणि तो दरीत कोसळला. भविक दरीत कोसळल्याची माहिती मिळताच माउंटन रेस्क्यू टीम आणि भारतीय सैन्याने एकत्रितपणे मदत आणि बचाव कार्य सुरु केले. उशीरपर्यंत मदत आणि बचाव कार्य सुरु होते. मात्र, त्याला यश आले नाही. भाविकाचा मृत्यू झाला.

दरम्यान, विजय कुमार शाह याच्यासोबत असलेल्या ममता कुमारी या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर ब्रारीमार्ग बेस कॅम्प रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. या वर्षातील अमरनाथ यात्रेतील हा दुसरा मृत्यू आहे. 15 ऑगस्ट रोजी दिल्लीतील 65 वर्षीय यात्रेकरूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

व्हिडिओ

अमरनाथ यात्रा ही जम्मू आणि काश्मीरमधील वार्षिक यात्रा आहे. यात्रेला 1 जुलैपासून सुरुवात झाली होती आणि ती 15 ऑगस्टला संपणार होती. यावर्षी साडेचार लाखांहून अधिक भाविकांनी यात्रेसाठी नोंदणी केली आहे. ही यात्रा एक आव्हानात्मक असते, कारण यात्रेसाठी डोंगर आणि पर्वतरांगांतून वाट काढावी लागते. त्यामुळे यात्रेकरूंना सावधगिरी बाळगण्याचा आणि संभाव्य धोक्यांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला जातो. या यात्रेसाठी केवळ भारतच नव्हे तर जगभरातून लोक दाखल होत असतात. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने राज्य आणि केंद्र सरकारला अधिक काळजी घ्यावी लागते.