Air India च्या विमानाला दोन तास उशीर, जेवणाचा डब्बा धुण्यावरून पायलट आणि कर्मचाऱ्यांमध्ये राडा
एयर इंडियाच्या बंगळूर ते कोलकाता विमानामध्ये पायलट आणि कर्मचाऱ्यांना एका शुल्लक कारणावरून मोठा राडा झाला, यामुळे विमानाला दोन तास उशीर होऊन प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.
नवी दिल्ली : सरकारी विमान कंपनी एयर इंडिया (Air India) च्या उशिरा सेवेवरून (Flight Delay) नेहमीच तक्रारी ऐकू येत असतात. कधी तांत्रिक कारणांवरून तर कधी कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक वादामुळे या विमान सेवेला प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागत असते. मात्र इतक्या तक्रारी येऊन सुद्धा कर्मचाऱ्यांचे राडे काही संपायचं नाव घेत नाहीयेत, अलीकडेच बंगळुरुहून कोलकाताला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला दोन तासांचा उशीर झाला, यामागील कारण तर इतकं शुल्लक होतं की ते ऐकून तुम्हाला हसावं की रागवावं असा प्रश्न पडेल.
झालं असं की, विमानाच्या पायलटने एका दुसऱ्या कर्मचाऱ्याला जेवणाचा डबा धुण्यास सांगितल्याने त्याला राग आला आणि यावरून त्यांच्यामध्ये बाचाबाचीला सुरुवात झाली. वाद वाढत जाऊन इतका वाढला के या दोघांनी चक्क प्रवाशांच्या समोरच एकमेकांना मारायला चालू केलं. काही केल्या त्यांच्यातील हे वाद थांबत नसल्याने शेवटी क्रू मेंबरनी वरिष्ठांना या प्रकाराची माहिती दिली व तसेच दोघांना विमानातून खाली उतरविण्यात आले. मात्र, हे विमान उडविण्यासाठी एअर इंडियाकडे दुसरा पायलट आणि पर्सर नव्हता.या सगळ्या प्रकारानंतर त्यांची व्यवस्था करण्यात बराच वेळ गेल्याने विमानाला उड्डाण घ्यायला आणि परिणामी गंतव्य स्थानी पोहचायला तब्बल दोन तासांचा विलंब झाला.
हे ही वाचा- मुंबई: एअर इंडिया ची इमारत खरेदी करु शकते महाराष्ट्र सरकार, 1400 करोड रुपयांची लावली बोली
या झालेल्या प्रकाराची चौकशी एअर इंडिया आणि डीजीसीए करत आहेत. चौकशी अधिकाऱ्याच्या माहितीनुसार पायलटने घरून डबा आणला होता. तो त्याने गरम करण्यास दिला होता. डबा खाऊन झाल्यानंतर पायलटने त्याच कर्मचाऱ्याला डबा धुण्यास सांगितले. याला त्या कर्मचाऱ्याने नकार देताच वादाला सुरवात झाली आणि मग जो प्रकार झाला तो केवळ कंपनीची प्रतिमा डागळण्यास मदत करणारा होता.