Maharashtra Politics: आमदारांनंतर आता 12 खासदार उद्धव ठाकरेंची सोडणार साथ? 'या' नव्या दाव्याने शिवसेनेत घबराट
शिवसेनेचे माजी मंत्री आणि शिंदे गटात सामील झालेले आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी हा दावा केला आहे.
राज्यात नवे सरकार स्थापन होऊनही राजकीय वर्तुळात गोंधळ सुरूच आहे. शिवसेनेच्या 40 आमदारांनी (Shivsena MLA) बंडखोरी केल्यानंतर आता पक्षाचे 12 खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटात जाण्याच्या तयारीत असल्याचा दावा केला जात आहे. शिवसेनेचे माजी मंत्री आणि शिंदे गटात सामील झालेले आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी हा दावा केला आहे. पाटील यांच्या दाव्यामुळे शिवसेनेत (Shivsena) पुन्हा एकदा घबराट निर्माण झाली आहे. गुलाबरावांच्या या दाव्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची पुन्हा एकदा झोप उडाली आहे. ठाकरे यांच्यासमोर आता शिवसेनेला वाचवण्याचे मोठे आव्हान आहे.
दक्षिण मध्य मुंबईतील शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या बाजूने मतदान करण्यासाठी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले असताना गुलाबरावांनी हा दावा केला आहे. तर शिवसेनेने विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्या बाजूने मतदान करण्याचे जाहीर केले आहे. राहुल शेवाळे यांच्या या पत्रामुळे गुलाबरावांच्या दाव्याला आता बळ मिळाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या यादीत शिवसेनेच्या अनेक खासदारांची नावे आहेत, जे लवकरच शिंदे गटात सामील होऊ शकतात. (हे देखील वाचा: Shiv Sena-BJP-MNS: शिवसेना- भाजप भांडणात मनसेला लॉटरी? आमदार प्रमोद पाटील यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ?)
उद्धव ठाकरें यांनी लोकसभेत चीफ व्हिप बदलला
बंडखोर खासदारांच्या बातम्यांनंतर शिवसेनेने बुधवारी खासदार भावना गवळी यांच्या जागी राजन विचारे यांची लोकसभेतील पक्षाचे प्रमुख व्हिप म्हणून नियुक्ती केली. अशी माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली. तसेच गवळी या राज्यातील यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोरीदरम्यान शिवसेनेने भाजपसोबत पुन्हा युती करावी, असे सुचविणाऱ्या शिवसेनेच्या खासदारांपैकी ते एक आहेत.