Wife's Private Photos Viral: पत्नीचे खाजगी फोटो सोशल मीडियावर टाक, गुन्हा दाखल

मुंबईतील एका ३१ वर्षीय रेल्वे इंजिनीअरने घटस्फोटाच्या वादातून आपल्या पत्नीचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, दिंडोशी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Cyber Crime (फोटो सौजन्य - Pixabay)

मुंबईत एका ३१ वर्षीय इंजिनीअरने आपल्या पत्नीचे खाजगी आणि आक्षेपार्ह फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पीडित महिलेने घटस्फोटासाठी अर्ज केल्याचा राग मनात धरून आरोपीने हे कृत्य केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी मुंबईतील दिंडोशी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

वादाची पार्श्वभूमी आणि विवाहबाह्य संबंधांचे आरोप

पीडित महिला ३१ वर्षांची असून ती सध्या 'यूपीएससी' (UPSC) परीक्षेची तयारी करत आहे. आरोपी पती पश्चिम रेल्वेमध्ये वरिष्ठ विभाग अभियंता (Senior Section Engineer) म्हणून कार्यरत आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये या दोघांचा विवाह झाला होता. मात्र, लग्नानंतर काही काळातच पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचे पत्नीच्या निदर्शनास आले. यावरून दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती, ज्यामुळे ऑगस्ट २०२४ मध्ये पीडित महिला आपल्या माहेरी निघून गेली.

इन्स्टाग्राम अकाउंट हॅक आणि बदनामी

महिने वेगळे राहिल्यानंतर जून २०२५ मध्ये पीडित महिलेने वांद्रे कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. यामुळे संतापलेल्या पतीने महिलेचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक केले आणि तिच्या मित्रांशी तिचे नाव घेऊन चॅटिंग करण्यास सुरुवात केली. जानेवारी २०२६ मध्ये त्याने पत्नीच्या अकाउंटवर आक्षेपार्ह फोटो आणि पोस्ट अपलोड केल्या. तसेच, "घटस्फोटाची प्रक्रिया पुढे नेल्यास जीवे मारू," अशी धमकीही फोनवरून दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून २१ मार्च २०२६ रोजी दिंडोशी पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध एफआयआर (FIR) नोंदवला आहे. यामध्ये भारतीय न्याय संहितेचे कलम ३५१(२), ३५२, ३५६ आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६सी, ६६ई आणि ६७ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर पोलीस या प्रकरणाचा तांत्रिक पुरावा गोळा करत असून आरोपीच्या अटकेची प्रक्रिया सुरू आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement