अभिनेता Mithun Chakraborty भाजपमध्ये प्रवेश करणार? 7 मार्च रोजी रॅलीमध्ये पीएम नरेंद्र मोदींच्या सोबत स्टेज शेअर करण्याची शक्यता

जो गरीबांच्या हितासाठी कमी काम करतो त्याला मी नेहमीच साथ देईन.

मिथुन चक्रवर्ती (Photo credit : youtube)

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी (BJP) मध्ये लवकरच एक लोकप्रिय चेहरा सामील होण्याची शक्यता आहे. बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेता मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) हे भाजपमध्ये सामील होऊ शकतात अशी चर्चा आहे. कोलकाता येथील ब्रिगेड मैदानावर 7 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मेळाव्यातही ते स्टेज शेअर करू शकतात. बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या काही महिन्यांत बरीच मोठी नावे भाजपमध्ये सामील झाली आहेत. मिथुन यांनी गेल्या महिन्यातच संघ प्रमुख मोहन भागवत यांची भेट घेतली होती. या बैठकीपासूनच ते भाजपमध्ये प्रवेश करत असल्याच्या चर्चांना उधाण आले.

मिथुन चक्रवर्ती हे भाजपमध्ये प्रवेश करत असल्याच्या वृत्तावर कोणीही उघडपणे बोलले नाही किंवा कोणत्याही नेत्याकडून अजून काही ठोस प्रतिक्रिया मिळाली नाही. मिथुन यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या प्रश्नावर पश्चिम बंगालचे भाजपचे उपाध्यक्ष अर्जुन सिंह म्हणाले, 'जर ते भाजपमध्ये आले तर ते बंगाल आणि आमच्या पक्षासाठी चांगलेच असेल. जर त्यांनी पंतप्रधानांसोबत स्टेज शेअर केला तर बंगालमधील लोकांना आनंदच होईल.’

अभिनेता मिथुन चक्रवर्ती तृणमूल कॉंग्रेसच्या वतीने राज्यसभेचे खासदारही राहिले आहेत. 2014 ते 2016 पर्यंत ते सभागृहात होते. मात्र नंतर ते राजकारणापासून दूर गेले. 2015 मध्ये झालेल्या शारदा घोटाळ्याप्रकरणी त्यांना ईडीने समन्स बजावला होता. अलीकडेच चक्रवर्ती यांनी आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे दावे केले जात आहेत. परंतु, भागवत यांच्याशी आपले आत्मिक संबंध असल्याचे त्यांनी सांगितले होते. (हेही वाचा: West Bengal Assembly Elections 2021: ममता बॅनर्जी नंदीग्राम येथून लढणार, 291 TMC उमेदवारांची यादी जाहीर; 100 नव्या चेहऱ्यांना संधी)

राजकीय पक्षात सामील होण्याच्या प्रश्नावर मिथुन चक्रवर्ती म्हणाले होते की, मी नेहमीच समाजातील गरीब वर्गासाठी संघर्ष केला आहे. जो गरीबांच्या हितासाठी कमी काम करतो त्याला मी नेहमीच साथ देईन. दरम्यान, बंगालमधील 294 जागांसाठी आठ टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 27 मार्च रोजी होणार आहे. 2 मे रोजी निकाल लागतील.