7th Pay Commission: केंद्रीय सरकारी कर्मचार्‍यांसाठी खुशखबर; समोर आले DA Hike बाबत मोठे अपडेट, घ्या जाणून

उच्च श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 2 लाख रुपयांहून अधिकचा फायदा होणार असल्याचे मानले जात आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit: archived, edited, representative image)

केंद्रातील मोदी सरकार (Central Government) लवकरच केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना एक नाही तर दोन भेटी देण्याचा विचार करत आहे, ज्याची चर्चा जोरात सुरू आहे. केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात वाढ (DA Hike) करण्यासोबतच, सरकार डीए थकबाकीचे पैसेही खात्यात टाकू शकेल, असे मानले जात आहे. रिपोर्ट्सनुसार सरकार डीएमध्ये सुमारे 4 टक्के वाढ करेल, त्यानंतर पगारात बंपर वाढ दिसून येईल. इतकेच नाही तर सरकार 18 महिन्यांची थकबाकी डीएच्या थकबाकी खात्यात टाकणार असण्याची शक्यता आहे.

सरकारने अधिकृतपणे डीए वाढ आणि क्रेडिटची तारीख जाहीर केलेली नाही, परंतु मीडिया रिपोर्ट्स 15 मार्चपर्यंत ही घोषणा होण्याचा दावा करत आहेत. केंद्र सरकार कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या डीएमध्ये 4 टक्क्यांनी वाढ होणार असून, त्याद्वारे ती 42 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात विक्रमी वाढ होणार आहे. सध्या 38 टक्के डीए दिला जात आहे. (हेही वाचा: 'या' नंबरवर मिस्ड कॉल देऊन तुम्ही चेक करू शकता तुमच्या पीएफ खात्यातील शिल्लक; वाचा स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस)

सातव्या वेतन आयोगानुसार, सरकार दरवर्षी दोनदा डीए वाढ करते, ज्याचे दर जानेवारी आणि जुलैपासून लागू मानले जातात. दर 6 महिन्यांनी एकदा खात्यात या वाढीचे पैसे देखील जमा केले जातात. आता लवकरच सुमारे एक कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांची डीए थकबाकीची प्रतीक्षा संपणार आहे, अशी चर्चा जोरात सुरू आहे. आता जो डीए वाढणार आहे, त्याचे दर जानेवारीपासून लागू मानले जातील. यापूर्वी, सप्टेंबरमध्ये डीए वाढविण्यात आला होता, ज्याचे दर जुलैपासून लागू होते.

सरकार उर्वरित 18 महिन्यांची डीए थकबाकीदेखील खात्यात जमा करण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये कर्मचाऱ्यांना एकाचवेळी मोठी रक्कम हातात येईल. उच्च श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 2 लाख रुपयांहून अधिकचा फायदा होणार असल्याचे मानले जात आहे. सरकारने जानेवारी 2020 ते जून 2021 पर्यंतचे डीए थकबाकीचे पैसे दिलेले नाहीत.