75 Years of India's Independence: भारताचा 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी 259 सदस्यांची समिती गठीत; सोनिया गांधी, ममता बॅनर्जी, शरद पवार यांचाही समावेश
ही समिती राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम तयार करण्यासाठी धोरणात्मक दिशानिर्देश आणि मार्गदर्शक सूचना प्रदान करेल
देशाच्या स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन (75 Years Of India's Independence) भव्य पद्धतीने साजरा करण्याची योजना केंद्र सरकारने आखली आहे. यासाठी एक उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे. या समितीत 259 सभासदांचा समावेश असणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती कार्य करणार आहे. याबाबत सरकारने शुक्रवारी माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार या स्वातंत्र्योत्सव आयोजन समितीची पहिली बैठक 8 मार्च रोजी होणार आहे. या समितीत कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांचा समावेश आहे.
हा उत्सव 12 मार्चपासून सुरू होतील आणि 75 आठवड्यांपर्यंत हा उत्सव साजरा केला जाईल. या समितीत सर्व राज्यपाल, 28 मुख्यमंत्री, प्रसिद्ध कलाकार, क्रीडापटू आणि साहित्यिकांचा समावेश असून यामध्ये माजी राष्ट्रपती प्रतिभा देवी पाटील, सरन्यायाधीश एस.ए. बोबडे, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचा समावेश आहे. याशिवाय सद्गुरू आणि योगगुरू रामदेव हेदेखील याचे सदस्य आहेत.
राष्ट्रीय समितीत सर्व क्षेत्रातील प्रतिष्ठिवत व नामांकित नागरिकांचा समावेश आहे. ही समिती राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम तयार करण्यासाठी धोरणात्मक दिशानिर्देश आणि मार्गदर्शक सूचना प्रदान करेल. हा सोहळा 15 ऑगस्ट 2022 रोजी म्हणजेच, 12 मार्च 2021 पासून 75 आठवड्यांनंतर होण्याचा प्रस्ताव आहे. 12 मार्च हा महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात ऐतिहासिक मिठाच्या सत्याग्रहाचा 91वा वर्धापन दिन आहे.