Uttar Pradesh: गाझियाबाद येथील कारखान्यात झालेल्या स्फोटात 7 जण ठार, तर 4 जखमी; बचावकार्य सुरु
या घटनेत आतापर्यंत 7 जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. तर डझनहून अधिक लोक जखमी असल्याची माहिती मिळत आहे.
रविवारी दुपारी, गाझियाबादच्या (Ghaziabad) मोदीनगर तहसीलगत बरखवान गावात बेकायदेशीरपणे चालणार्या फटाक्यांच्या कारखान्यामोठा स्फोट झाला. या घटनेत आतापर्यंत 7 जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. तर डझनहून अधिक लोक जखमी असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच जिल्हा दंडाधिकारी अजय शंकर पांडे, वरिष्ठ पोलिस अधीक्षक कलानिधी नैथानी, व अन्य पोलिस व प्रशासन अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि पोलिसांनी कारखान्यातून मृतदेह बाहेर काढण्यासह आग विझविण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
या प्रकरणाची माहिती देत गाझियाबादचे डीएम अजय शंकर पांडे यांनी कारखान्यात झालेल्या स्फोटाची पुष्टी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी इथल्या कारखान्यात बॉम्ब बनवण्याचे काम सुरू होते. त्यावेळी सुमारे 30 जण कारखान्यात काम करत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, अचानक स्फोट होऊन आग लागली. पाहता पाहता एकामागून एक असे अनेक स्फोट झाले आणि संपूर्ण कारखान्याने पेट घेतला. आत काम करणाऱ्या मजुरांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते, त्यामुळे आत अडकून मजुरांचा मृत्यू झाला.
आता कारखान्यात स्फोट व आग नक्की कशामुळे लागली याचे कारण शोधले जात आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोदीनगर दुर्घटनेची तातडीने दखल घेतली आहे. सीएमओ कार्यालयाने जारी केलेल्या निर्देशानुसार गाझियाबाद जिल्ह्यातील डीएम व वरिष्ठ पोलिस अधीक्षकांना घटनास्थळी पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या, तसेच संध्याकाळपर्यंत घटना अहवालाचे आदेश देण्यात आले आहेत. (हेही वाचा: वाढदिवस साजरा करण्यासाठी हैद्राबाद येथे ज्वेलर्सने दिली 100 पेक्षा जास्त लोकांना पार्टी; काही दिवसांनी कोरोना विषाणूमुळे झाला मृत्यू)
दरम्यान, ग्रामस्थांनी सांगितले की, हा कारखाना सुमारे पाच वर्षांपासून रहिवासी क्षेत्रात बेकायदेशीरपणे सुरू आहे. पोलिस आणि प्रशासनाला याची संपूर्ण माहिती देण्यात आली असूनही, त्यांनी हे थांबविण्याचा प्रयत्न केला नाही. याआधी याच कारखान्यात काम करणाऱ्या कुणीतरी पोलिसात लेखी तक्रार दिली होती. यानंतर सीओ मोदीनगर व स्टेशन प्रभारी यांनी कारखान्यास भेट देऊन पाहणी केली.