आंध्र प्रदेश: स्कूल बस अपघातात 15 विद्यार्थी जखमी; दोघांची प्रकृती गंभीर

आंध्रप्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील स्कूल बसला झालेल्या अपघातात जवळपास 15 विद्यार्थी जखमी झाले आहेत.

School Bus accident in Andhra Pradesh (Photo Credit: ANI)

आंध्रप्रदेशातील (Andhra Pradesh) गुंटूर (Guntur) जिल्ह्यात स्कूल बसला (school bus) झालेल्या अपघातात जवळपास 15 विद्यार्थी जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर जखमींना तात्काळ जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर दोन विद्यार्थ्यांची प्रकृती फारच गंभीर आहे. पोलिस घटनास्थळी पोहचले असून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. (आंध्र प्रदेश: दुसरीत शिकणाऱ्या 8 वर्षांच्या मुलीचा शिक्षकाकडून लैंगिक छळ)

ही दुर्घटना वेल्दुर्ती मंडळातील मंदाडीगोड गावाजवळ घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांनी याप्रकरणी प्रशासनाला दोषी ठरवले असून त्याविरुद्ध घोषणाबाजीही केली. या दुर्घटनेला प्रशासनाचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचे, पालकांचे म्हणणे आहे.

स्कूल बसची अवस्था ठीक नसल्याने ही दुर्घटना घडली, अशी टीकाही पालक करत आहेत. अद्याप अपघाताचे खरे कारण उघडकीस आलेले नाही.