धक्कादायक! ऑनलाइन गेम Free Fire मध्ये गमावले 40,000 रुपये; नैराश्येमधून 13 वर्षीय मुलाची आत्महत्या, ऑपरेटरविरोधात गुन्हा दाखल

यामागचे समोर आलेले खरे कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या कृष्णा पांडेने गेल्या काही दिवसांपासून मोबाईलवर फ्री फायर ऑनलाइन गेम (Free Fire Online Game) खेळून त्यात सुमारे 40 हजार रुपये गमावले होते.

Representational Image (Photo Credits: Pixabay)

छतरपूर (Chhatarpur) शहरातील एका 13 वर्षीय मुलाने शुक्रवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. यामागचे समोर आलेले खरे कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या कृष्णा पांडेने गेल्या काही दिवसांपासून मोबाईलवर फ्री फायर ऑनलाइन गेम (Free Fire Online Game) खेळून त्यात सुमारे 40 हजार रुपये गमावले होते. जेव्हा त्याच्या आईने त्याला याबाबत फटकारले तेव्हा त्याने यामुळे आलेल्या नैराश्यामुळे आत्महत्येचे पाऊल उचलले. छतरपूर शहरातील सागर रोडवर पॅथॉलॉजी ऑपरेट करणारे विवेक पांडे आणि जिल्हा रुग्णालयात कार्यरत प्रीती पांडेचा 13 वर्षांचा मुलगा कृष्णा पांडे ऑनलाईन अभ्यासासाठी अँड्रॉइड मोबाईल वापरत होता.

यादरम्यान त्याला ऑनलाईन गेम ‘फ्री फायर’ खेळण्याची सवय लागली होती. ज्यामध्ये बऱ्याचदा टार्गेटला हिट करण्यासाठी ऑनलाईन काही पैसे खात्यातून वजा होत असत. आदल्या दिवशी कृष्णाची आई प्रीती पांडेच्या खात्यातून सुमारे 1500 रुपये कापले गेले होते. यासंदर्भात त्यांनी घरी फोन करून घरी असलेला मुलगा कृष्णाची कानउघडणी केली होती. मुलगा ऑनलाईन गेम खेळतो, ज्यामध्ये पैसे कट होतात हे समजल्यावर आईने नाराजी व्यक्त केली होती.

घरात उपस्थित असलेल्या कृष्णाच्या मोठ्या बहिणीच्या म्हणण्यानुसार, आईशी फोनवर संभाषण संपल्यानंतर कृष्णाने त्याच्या खोलीत जाऊन दरवाजा आतून बंद केला. काही वेळाने बहिणीने खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण तो उघडला नाही व हे पाहून बहीण घाबरली. त्यानंतर तिने ताबडतोब याची पालकांना माहिती दिली. पालक घरी पोहचल्यानंतर त्यांनी दरवाजा तोडला आणि आतील दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. खोलीच्या आत त्यांचा एकुलता एक मुलगा कृष्णाचा मृतदेह पंख्याला लटकला होता.

याबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सायंकाळी उशिरा त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेनंतर संपूर्ण कुटुंब हादरून गेले आहे. कृष्णाच्या मृत्यूनंतर एक सुसाईड नोट सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. ज्यात त्याने लिहिले आहे की, 'मी एक गेम खेळत होतो ज्याचे नाव नाव फ्री फायर गेम आहे. या गेमसाठी मी माझ्या आईच्या खात्यातून 40000 रुपये काढले आहेत. याचे मला खूप दुःख आहे व त्यामुळेच मी आत्महत्या करत आहे, आई रडू नको.'

कृष्णा पांडेच्या आत्महत्येप्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी गेमच्या ऑपरेटरविरोधात अल्पवयीन मुलाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मुलाची सुसाईड नोट, कुटुंबातील सदस्यांचे स्टेटमेंट, बँक खाती आणि ऑडिओ क्लिपच्या आधारे पोलिसांनी कंपनीच्या अज्ञात ऑपरेटरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (हेही वाचा: Navi Mumbai: नवी मुंबईत दोन सख्या बहिणींची गळफास लावून आत्महत्या, पोलीस तपास सुरू)

याबाबत गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले की, मी यासंदर्भात विधी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सल्लाही मागितला आहे, त्यावरच विचार केल्यानंतर अशा कंपन्यांना कायद्याच्या कक्षेत आणून कठोर कारवाई केली जाईल.