32 वर्षांच्या तरुणाने अमेरिकेत पलायन करण्यासाठी घेतला 81 वर्षांच्या वृद्धाचा वेश; CISF अधिकाऱ्यांकडून विमानतळावर अटक

जयेश पटेल (Jayesh Patel) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून. तो अहमदाबाद येथील रहिवासी आहे. 32 वर्षीय जयेश पटेल 81 वर्षीय अमरिक सिंह बनून न्यूयॉर्कसाठी रवाना होत होता. यासाठी त्याने वृद्धाचा वेश घेतला होता

जयेश पटेल (संग्रहित संपादित प्रतिमा)

दिल्ली विमानतळावर सीआयएसएफने (CISF) बनावट पासपोर्ट वापरुन परदेशात पलायन करणाऱ्या एका व्यक्तिला अटक केली आहे. आश्चर्य म्हणजे या तरुणाने वृद्धाच्या वेशात परदेशाबाहेर जाण्याची योजना आखली होती. मात्र ऐनवेळी त्याचे हे बिंग फुटले आणि ही योजना बारगळली. जयेश पटेल (Jayesh Patel) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून. तो अहमदाबाद येथील रहिवासी आहे. 32 वर्षीय जयेश पटेल 81 वर्षीय अमरिक सिंह बनून न्यूयॉर्कसाठी रवाना होत होता. यासाठी त्याने वृद्धाचा वेश घेतला होता.

सीआयएसएफच्या म्हणण्यानुसार, जयेश पटेल आपले केस आणि दाढी रंगवून, रविवारी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला.यावेळी तो व्हीलचेअरवर होता व त्याला न्यूयॉर्कला जायचे आहे असे त्याने सांगितले. जयेश पटेलकडे असलेला पासपोर्ट अमरिक सिंहचा होता, त्यामध्ये व्यक्तीचे वय 81 वर्षे असल्याचे नमूद केले होते. जयेश पटेल यांच्या वागण्यावर प्रथमदर्शनी कोणीच शंका घेतली नाही. सर्वांनाच तो 81 वर्षांचा वृद्ध वाटला. परंतु सीआयएसएफच्या अधिकाऱ्यांना काही संशयास्पद जाणवले. पासपोर्टमधील व्यक्तीचे वय 81 वर्षे होते मात्र जयेशची त्वचा एखाद्या तरुण व्यक्तीची भासत होती. (हेही वाचा: नागपूर विमानतळावर शरीरातून सोन्याची पेस्ट तस्करी करत असलेल्या दोघांना अटक)

सीआयएसएफ अधिकाऱ्यांनी याबाबत जेव्हा त्याच्याकडे चौकशी केली तेव्हा जयेशने व्हीलचेयरवरुन उठण्यास नकार दिला. त्यानंतर जेव्हा त्याची बारकाईने तपासणी केली गेली तेव्हा तेव्हा तो वृद्ध नसून चक्क एक 32 वर्षांचा तरुण असल्याचे समोर आले. त्यानंतर आरोपीला पुढील तपासणीसाठी इमिग्रेशन अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आले.