Delhi Violence: दिल्ली हिंसाचारात 13 जणांचा मृत्यू, 200 हून अधिक जखमी; रात्री 12 वाजता न्यायाधीशांच्या घरी पार पडली सुनावणी
राष्ट्रीय राजधानीच्या ईशान्य दिल्लीत आतापर्यंत झालेल्या हिंसक निदर्शनांमध्ये, 13 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे,
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भारत भेट चांगलीच गाजली. एकीकडे देशातील नेते ट्रंप यांची सरबराई करण्यात मग्न होते, तर दुसरीकडे नागरिकत्व दुरुस्ती कायद्यात (CAA) संबंधात, गेल्या 2 दिवसांपासून दिल्लीत (Delhi) भयंकर हिंसाचार (Violence) चालू होता. राष्ट्रीय राजधानीच्या ईशान्य दिल्लीत आतापर्यंत झालेल्या हिंसक निदर्शनांमध्ये, 13 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर 56 पोलिसांसह 200 जण जखमी झाल्याची माहिती आहे.
हिंसाचारानंतर, ईश्यान्य दिल्लीतील जाफराबाद, मौजपूर, बाबरपूर आणि चांदबागमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर, लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करण्याची मागणी करण्यासाठी तसेच दिल्ली हिंसाचारातील दोषींवर कारवाईची मागणी करण्यासाठी अनेक लोक जमा झाले होते. मात्र पोलिसांनी त्यांना हटवले आहे.
सीएएबाबत पूर्वोत्तर दिल्लीतील काही भागात मंगळवारी पुन्हा हिंसाचार झाला. तेथे दगडफेक करून दुकाने फोडण्यात आली, गोळीबार व जाळपोळही केली गेली. बर्याच भागात परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर पोलिसांना हिंसाचार घडवणाऱ्या लोकांना गोळ्या घालण्याचे आदेश दिले. हिंसाचारामध्ये आतापर्यंत 13 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 200 हून अधिक लोक जखमी आहेत. गृह मंत्रालयाने कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सीआरपीएफ डीजी ट्रेनिंग एस एन श्रीवास्तव यांच्याकडे सोपविली आहे. (हेही वाचा: CAA Protest: दिल्ली पोलिसांनी जखमी आंदोलकांना मारहाण करत गायला लावलं राष्ट्रगीत (Watch Video))
सर्वाधिक हिंसाचार मौजपूर आणि कर्दमपुरी येथे झाला. सीएएचे विरोधक आणि समर्थक येथे उघडपणे गोळीबार करत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही बाजूंकडून जवळजवळ एक हजाराहून अधिक गोळ्या झाडण्यात आल्या. त्यांचा पाठलाग करण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुरांचा गोळीबार केला. दुपारी मौजपुर आणि कर्दमपुरी, सुदामपुरी येथेही गोळीबार झाला. करावल नगर मेन रोडवर दुचाकी आणि घरांना आगी लावण्यात आल्या. हीच परिस्थिती मौजपूर, नूर इलाही येथेही होती. घोंडा चौकात मिनी बससह अनेक ई-रिक्षा, दुचाकी व इतर वाहने जाळली गेली. पूर्वोत्तर जिल्ह्यातील 100 हून अधिक दुकानांना लुटून आग लावली. याबाबत पोलिसांनी आतापर्यंत 11 जणांवर गुन्हा दाखल केला आहे व 25 लोकांना ताब्यात घेतले आहे.
दिल्लीतील हिंसाचाराबद्दल दिल्ली हायकोर्टाचे न्यायमूर्ती मुरलीधर यांच्या घरी मध्यरात्री सुनावणी झाली. ईशान्य दिल्लीतील हिंसाचारातील जखमींना मोठ्या सरकारी रुग्णालयात दाखल करावे आणि रुग्णवाहिकांना सुरक्षा पुरवावी या मागणीच्या याचिकेवर रात्री 12 वाजेच्या सुमारास सुनावणी झाली. मध्यरात्री न्यायाधीश मुरलीधर यांनी डीसीपीशी फोनवर संवाद साधला आणि जखमींना तत्काळ जवळच्या मोठ्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश दिले.