Jammu Kashmir मधील मोबाइल Post Paid सेवा सोमवारपासून पुन्हा सुरु; इंटरनेटच्या वापरावरील बंदी अजूनही कायम
सोमवारी दुपारपासून ही सेवा सुरु केली जाणार आहे.
370 कलम काढून टाकल्यानंतर तब्बल 2 महिन्यांनी जम्मू काश्मीर (Jammu and Kashmir) मधील मोबाईल पोस्ट पेड सेवा अखेर पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी दुपारपासून ही सेवा सुरु केली जाणार आहे. जम्मू काश्मीरचे मुख्य सचिव रोहित कंसल यांनी आज पत्रकार परिषद घेऊन या गोष्टीची घोषणा केली. ही सेवा वास्तविक शनिवारपासून लागू केली जाणार होती. पण काही कारणास्तव आता ही सोमवारी दुपारी 12 वाजल्यापासून सुरु होणार आहे. असे असले तरी अजूनही इंटरनेट सेवेचा लाभ घेण्यासाठी जनतेला काही काळ वाट बघावी लागणार आहे.
काश्मीरचे विशेष हक्क काढून घेतल्यानंतर मोबाईल सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. त्यामुळे स्थानिक जनतेला खूप समस्यांना समोर जावं लागलं होतं. खासकरून व्यापारी वर्गाला या गोष्टीचा खूप तोटा झाला होता. पण आता 99% काश्मीर निर्बंधरहित असल्याचं देखील कंसल यांनी म्हटले आहे.
16 ऑगस्ट पासून बंधनं कमी करण्याच्या प्रक्रियेला आरंभ झाला. 17 ऑगस्टला लँडलाईन सेवेवरचे काही ठिकाणचे निर्बंध उठवण्यात आले होते. त्यानंतर 4 सप्टेंबरला ती पूर्णपणे पूर्ववत करण्यात आली. आतंकवादी संघटनांची जनतेच्या मनातली दहशत कमी करण्यासाठी हे निर्णय घेण्यात आले होते. फक्त BSNL चाच वापर केला जावा असाही प्रस्ताव मांडण्यात आला होता.
केंद्र सरकारने पर्यटनावरील बंदी उठवल्यानंतर काहीच दिवसात हा निर्णय घेण्यात आला आहे. पर्यटन संस्थांनी प्रशासनाची भेट घेऊन मोबाईल सेवा बंद असल्यास कोणीही पर्यटक खोर्यात येणार नाही, असे सांगितले होते.