Madhya Pradesh Dalit Rape Case: अल्पवयीन दलित बलात्कार पीडितेला पोलीस ठाण्यात बेल्ट आणि लाथांनी बेदम मारहाण; तीन पोलिस अधिकारी निलंबित

बलात्कार पीडितेला रात्रभर पोलीस ठाण्यात डांबून ठेवून मारहाण केल्याच्या आरोपावरून शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी (एसएचओ) अनूप यादव, उपनिरीक्षक मोहिनी शर्मा आणि सहायक उपनिरीक्षक गुरुदत्त शेषा यांना निलंबित करण्यात आले आहे.

Stop Rape (Representative image)

Madhya Pradesh Dalit Rape Case: मध्य प्रदेशात एका 13 वर्षीय दलित बलात्कार पीडितेला पोलीस ठाण्यात मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन बलात्कार पीडितेने तक्रार घेऊन पोलिस स्टेशन गाठले होते. तिथे तिला रात्रभर बळजबरीने पोलिस ठाण्यात डांबून ठेवले आणि मारहाण करण्यात आली. हे प्रकरण छतरपूर शहरातील आहे.

त्याचवेळी हे संपूर्ण प्रकरण समोर आल्यानंतर कारवाई करत तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणावर बोलताना एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, 'ही घटना 30 ऑगस्ट रोजी घडली असून याप्रकरणी तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.' याशिवाय बाबू खान नावाच्या व्यक्तीला 3 सप्टेंबर रोजी अल्पवयीन दलित मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी भारतीय दंड संहितेसह बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्याच्या संबंधित कलमांखाली अटक करण्यात आली आहे. (हेही वाचा -Building Collapse in Delhi: आझाद मार्केटमध्ये 4 मजली इमारत कोसळली, 8 कामगार दबल्याची शक्यता; अग्निशमन दलाच्या पथकाकडून बचावकार्य सुरू)

सिटी कोतवाली स्टेशन प्रभारी निलंबित -

बलात्कार पीडितेला रात्रभर पोलीस ठाण्यात डांबून ठेवून मारहाण केल्याच्या आरोपावरून शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी (एसएचओ) अनूप यादव, उपनिरीक्षक मोहिनी शर्मा आणि सहायक उपनिरीक्षक गुरुदत्त शेषा यांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा बालकल्याण समिती (CWC) कडून बलात्काराची तक्रार आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, पीडितेच्या आईने सांगितले की, 27 ऑगस्ट रोजी मुलगी घराबाहेर खेळण्यासाठी गेली होती, परंतु ती परत आली नाही. त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी त्याच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. 30 ऑगस्ट रोजी ती घरी परतली तेव्हा तिने सांगितले की, बाबू खव तिला जबरदस्तीने आपल्या घरी घेऊन गेला आणि त्याने तिच्यावर बलात्कार केला.

पीडितेच्या आईचा आरोप आहे की, आम्ही पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेलो होतो, तिथे दोन पोलिसांनी मुलीवर तिचे म्हणणे बदलण्यासाठी दबाव टाकला आणि तिला मारहाण केली. पीडितेच्या आईने सांगितले की, यादरम्यान एका पोलीस अधिकाऱ्याने मला बाहेर काढले आणि मुलीला पाठीमागे लाथ आणि बेल्टने मारहाण केली.