Ministry Of Health Guidelines: कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाकडून धार्मिक स्थळ, मॉल्स, हॉटेल, ऑफिस संदर्भात मार्गदर्शक सुचना जारी
देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने (Ministry Of Health) शुक्रवारी धार्मिक स्थळ, मॉल्स आणि हॉटेल संदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे (Guidelines) जाहीर केली आहेत. देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी देशात आतापर्यंत पाच वेळा लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. परंतु, लॉकडाऊन 5.0 मध्ये सरकारने अनेक अटींमध्ये शिथिलता दिली आहे. मात्र, असं असलं तरी नागरिकांनी स्वत: ची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आरोग्य मंत्रालयाने नागरिकांसाठी काही मार्गदर्शक सुचना जाहीर केल्या आहेत. (हेही वाचा - धक्कादायक! भारतात नव्या COVID-19 रुग्णांच्या संख्येने पार केला 10 हजारांचा टप्पा, देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 2,97,535 वर)
धार्मिक स्थळासंदर्भातील गाईड लाईन्स -
आरोग्य मंत्रालयाने धार्मिक स्थळा संदर्भातील केलेल्या प्रतिबंधात्मक सूचनांनुसार, नागरिकांनी मंदिरात दर्शनासाठी येण्याअगोदर स्वतःच्या वाहनात पादत्राणे किंवा शूज काढून टाकावेत. नागरिकांनी मंदिरातील पुतळे, मूर्ती, पवित्र पुस्तकांना स्पर्श करू नये. मंदिरात जाताना प्रत्येकाने आपला चेहरा मास्कने झाकून घ्यावा. मास्क न घालणाऱ्यांना मंदिरात दर्शनासाठी परवानगी देण्यात येणार नाही, असंही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.
हॉटेल्स संदर्भातील गाईड लाईन्स -
लॉकडाऊन 5.0 मध्ये हॉटेल सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. हॉटेल्समध्ये पार्किंगसाठी योग्य व्यवस्था असावी. हॉटेल्समध्ये गर्दीचे योग्य व्यवस्थापन असले पाहिजे. तसेच हॉटेल्समधील वॉशरूमध्ये योग्य सफाई असावी. हॉटेल मंत्रालयाच्या निर्देशानुसार हॉटेल्समधील स्वयंपाकघरातील स्वच्छता असावी. हॉटेल्समध्ये सेवा देणाऱ्या वेटर्संनी मास्क घालणं गरजेचं आहे.
ऑफिस संदर्भातील गाईड लाईन्स -
कार्यालयांमधील प्रतिबंधात्मक उपायांबाबत आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, कंटमेंट झोनमध्ये राहणाऱ्या कर्मचार्यांसाठी घरातून काम करण्यास परवानगी द्यावी. ऑफिसमध्ये एकत्र काम करणं टाळा. तसेच वृद्ध व्यक्ती आणि गर्भवती कर्मचाऱ्यांची योग्य खबरदारी घ्या. कार्यालयाच्या ठिकाणी 24-30 डिग्री सेल्सिअस तापमान राखले जावे. तसेच याठिकाणी 40-70% सापेक्ष आर्द्रता असावी, असंही आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.
शॉपिंग मॉल्स -
नागरिकांची शॉपिंग मॉल्समध्ये प्रवेश करताना थर्मल स्क्रीनिंग आणि सॅनिटायझर डिस्पेंसर करणं अनिवार्य आहे. दुकाने आणि पार्किंगच्या ठिकाणी सामाजिक अंतरासाठी विशिष्ट खुणा आणि नियमित साफसफाई / निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. शॉपिंग मॉल्समध्ये लिफ्ट, कॅफेमध्ये सामाजिक अंतर राखणं गरजेचं आहे. मॉल्समधील गेमिंग क्षेत्रे, सिनेमा हॉल बंद राहतील, असंही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.