Tripura New CM: अखेर ठरलं! माणिक साहा होणार त्रिपूराचे नवे मुख्यमंत्री; 8 मार्चला घेणार शपथ

सोमवारी (६ मार्च) भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. नव्या सरकारचा शपथविधी सोहळा 8 मार्चला होणार आहे.

Manik Saha (PC - Facebook)

Tripura New CM: माणिक साहा (Manik Saha) हे 8 मार्च रोजी त्रिपुरा (Tripura) चे पुढील मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. या निवडीला पक्षाच्या सर्व आमदारांनी एकमताने पाठिंबा दिल्याची माहिती भाजपच्या प्रवक्त्याने बैठकीनंतर पत्रकारांना दिली. आगरतळा येथे झालेल्या भाजप विधानसभा पक्षाच्या बैठकीत सोमवारी ईशान्येकडील त्रिपुराचे पुढील मुख्यमंत्री म्हणून माणिक साहा यांची निवड करण्यात आली. नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 8 मार्चला होणार आहे.

माणिक साहा यांची त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदी फेरनिवड झाली आहे. सोमवारी (६ मार्च) भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. माणिक साहा यांची मुख्यमंत्री म्हणून ही सलग दुसरी टर्म असेल. भाजपने 60 सदस्यीय विधानसभेत 32 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले, तर त्याचा मित्रपक्ष, इंडिजिनस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा (IPFT) ने एक जागा जिंकली. (हेही वाचा - CM Oath Ceremony: मेघालय-नागालँड 7 मार्चला तर त्रिपुरामध्ये 8 मार्चला होणार शपथविधी; पंतप्रधान मोदीही राहणार उपस्थित)

राज्य विधानसभा निवडणुकीसाठी 16 फेब्रुवारी रोजी मतदान झाले आणि गुरुवारी निकाल जाहीर झाला. निवडणूक निकालानंतर त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी आपल्या सरकारचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला. यानंतर त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांच्या नावावरून भाजपमध्ये चर्चा सुरू होती.

रविवारी दिल्लीतील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि इतर वरिष्ठ नेत्यांची बैठकही झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत केंद्रीय मंत्री प्रतिमा भौमिक यांच्या नावावरही चर्चा झाली, मात्र केंद्रीय नेतृत्व साहांच्या बाजूनेच राहिले. सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्यमंत्री भौमिक यांनी धानपूर विधानसभा मतदारसंघातून सहज विजय मिळवला आहे.

दरम्यान, नव्या सरकारचा शपथविधी सोहळा 8 मार्चला होणार आहे. त्यात सामील होण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) अध्यक्ष जेपी नड्डा मंगळवारी संध्याकाळी आगरतळा येथे पोहोचतील. पंतप्रधान नरेंद्र मोदीही शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. भाजपशासित राज्यांचे अनेक मुख्यमंत्रीही शपथविधीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.