हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींचे एन्काऊंटर करणारे पोलिस सिंघम वी.सी. सज्जनार कोण आहेत; जाणून घ्या
सज्जनार यांच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर वृत्त...
मागील आठवड्यात हैदराबादमध्ये 27 वर्षीय महिला वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून तिला जाळून मारण्यात आले होते. त्यानंतर हैदराबादमध्ये रंगारेड्डी जिल्ह्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला होता. या गुन्ह्यात अटक केलेल्या चारही आरोपींचा पोलिसांनी मध्यरात्री एन्काऊंटर केला आहे. यात चारही आरोपींचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी सायबराबादचे पोलिस आयुक्त वी.सी. सज्जनार यांच्या नेतृत्वाखाली हा एन्काऊंटर केला आहे. त्यामुळे सध्या सज्जनार यांनी केलेल्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. सज्जनार यांनी या प्रकरणात अत्यंत मोलाची कामगिरी केली आहे. ते 1996 च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. (हेही वाचा - हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींचा पोलिसांकडून एन्काऊंटर)
सज्जनार यांनी स्पेशल इंटेलिजन्स ब्रँचच्या आयजीपदी आणि त्याच ब्रँचच्या डेप्युटी आयजी पदही कामकाज पाहिले आहे. साबराबादच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर सज्जनार यांनी महिलांची सुरक्षा हेच आपलं प्राधान्य असल्याचे सांगितले होते. सज्जनार यांनी तेलंगणातील जनगाव येथून अतिरिक्त पोलिस अधिक्षक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी 'दिशा' बलात्कार प्रकरणात चौकशीचे आदेश दिले होते. सज्जनार यांच्या प्रयत्नांमुळे तसेच इतर पोलिस अधिकाऱ्याच्या मदतीने केवळ 8 दिवसांतच याप्रकरणाचा निकाल लागण्यात यश आले आहे.
सज्जनार यांना एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जाते. सज्जनार यांनी 2008 मध्ये तेलंगणातील एका महिलेवर झालेल्या अॅसिड हल्ल्यातील 3 आरोपींचे एन्काऊंटर केले होते. सज्जनार यांनी हैदराबादमधील दिशा प्रकरणात केलेल्या कामगिरीमुळे सोशल मीडियावर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.