Coronavirus: केंद्रीय विद्यालयातील 1 ली ते 8 पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना पास करणार; केंद्रीय विद्यालय संघटनेचा निर्णय
याच पार्श्वभूमीवर केंद्रीय विद्यालय संघटनेकडून महत्तवपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय विद्यालयातील 1 ली ते 8 पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना पास करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली नाही, तरीदेखील त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे.
Coronavirus: देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय विद्यालय (Kendriya Vidyalayas) संघटनेकडून महत्तवपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय विद्यालयातील 1 ली ते 8 पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना पास करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली नाही, तरीदेखील त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमी केंद्रीय विद्यालय आणि इतर सर्व शाळांमध्ये 31 मार्चपर्यंत सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. देशात तसेच राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. (हेही वाचा - Coronavirus: केंद्र सरकारचा मोठा निर्णय; संपूर्ण भारतात 21 दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर, पीएम नरेंद्र मोदी यांनी केली घोषणा)
दरम्यान, राज्यातदेखील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मागील आठवड्यात दिली होती. तसेच याच पार्श्वभूमीवर दहावीचा पेपरही पुढे ढकलण्यात आला आहे. याशिवाय नववी आणि अकरावीच्या परिक्षेचा निर्णय 15 एप्रिलनंतर घेण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शिक्षकांनादेखील घरातून पेपर तपासण्याची मुभा देण्यात आली आहे.
आज देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 470 हून अधिक झाली आहे. तसेच राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 107 वर पोहचली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू केली आहे. तसेच राज्यातील सर्व जिल्ह्याच्या सीमा सिल केल्या आहेत.