UPSC कडून केंद्र सरकारच्या विविध पदांसाठी थेट भरतीची जाहिरात, 12 सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) केंद्र सरकारच्या विविध पदांसाठी थेट भरतीची घोषणा केली असून, पात्र उमेदवारांकडून १२ सप्टेंबर २०२६ पासून ऑनलाइन अर्ज मागवण्यात येणार आहेत.

Government Jobs | (File Photo)

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) केंद्र सरकारच्या विविध विभागांतील पदांवर थेट भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (PIB) यासंदर्भात 10 सप्टेंबर 2026 रोजी अधिकृत माहिती प्रसिद्ध केली. इच्छुक उमेदवारांना upsconline.nic.in या ऑनलाइन अर्ज पोर्टलद्वारे अर्ज सादर करता येणार आहेत. आयोगाने स्पष्ट केले आहे की, या भरतीसंदर्भातील सविस्तर जाहिरात क्रमांक ११/२०२६ तसेच उमेदवारांसाठी आवश्यक सूचना लवकरच आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर  अर्थात upsc.gov.in  वर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. या जाहिरातीत पदनिहाय पात्रता निकष, रिक्त पदांची संख्या आणि इतर आवश्यक तपशील नमूद केला जाईल.

अर्ज प्रक्रियेचा कालावधी

इच्छुक उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी दोन वेगवेगळे कालावधी निश्चित करण्यात आले आहेत. लडाख केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासनाअंतर्गत नसलेल्या पदांसाठी अर्जदारांना 12 सप्टेंबर 2026 ते 2 ऑक्टोबर 2026 या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. तर लडाख केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासनाअंतर्गत येणाऱ्या पदांसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 9 ऑक्टोबर 2026 निश्चित करण्यात आली आहे.

अर्ज कसा करावा

पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी upsconline.nic.in या अधिकृत ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे. अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरातीत नमूद केलेली पदनिहाय पात्रता, वयोमर्यादा आणि इतर अटी काळजीपूर्वक तपासाव्यात, असे आयोगाकडून सुचवण्यात आले आहे.

उमेदवारांसाठी सूचना

यूपीएससी वेळोवेळी केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांतील गट अ आणि गट ब संवर्गातील पदांसाठी थेट भरती प्रक्रिया राबवत असते. या भरतीअंतर्गत सामान्यतः मुलाखतीद्वारे किंवा आवश्यकतेनुसार लघु चाचणीनंतर मुलाखत घेऊन निवड प्रक्रिया पार पाडली जाते. इच्छुक उमेदवारांना अधिक तपशीलवार माहितीसाठी नियमितपणे आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement