Aadhar Card New Rule: आय-टी रिटर्न भरताना चुकीचा आधार तपशील दिल्यास होणार 10,000 रुपयांचा दंड

त्यानुसार आता आधार कार्डावर जर का तुम्ही दिलेली माहिती खोटी आढळली, तर तुम्हाला 10,000 रुपयांचा दंड होऊ शकतो

Aadhar Card (Photo Credits: PTI)

सध्या आधार कार्ड (Aadhaar Card), सामान्य माणसाची ओळख बनले आहे. आज प्रत्येक सरकारी कामात तसेच इतर अनेक ठिकाणी आपली ओळख दाखवण्यासाठी वापरण्यासाठी आधार हे मुख्य दस्तऐवज बनला आहे. परंतु, याचा वापर अत्यंत सावधगिरीने करावा, अन्यथा तुम्हाला भारी दंड भरावा लागू शकतो. आधार कार्डच्या वापरासंदर्भात काही नवीन नियम बनविण्यात आले आहेत. त्यानुसार आता आधार कार्डावर जर का तुम्ही दिलेली माहिती खोटी आढळली, तर तुम्हाला 10,000 रुपयांचा दंड होऊ शकतो.

प्राप्तिकर विभागाने करदात्यांच्या सोयीसाठी पॅन क्रमांकाऐवजी 12-अंकी आधार क्रमांक वापरण्याची परवानगी दिली आहे. परंतु आधार कार्ड वापरताना आपल्याला खूप सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. जर तुम्ही चुकीचा आधार क्रमांक दिला तर तुम्हाला दहा हजार रुपये भरपाई करावी लागेल. जिथे पॅन नंबरऐवजी आधार क्रमांक वापरास परवानगी देण्यात आली आहे, अशा ठिकाणी हा नियम लागू होईल. उदाहरणार्थ, आयकर विवरणपत्र भरणे, बँक खाती उघडणे किंवा 50 हजारापेक्षा जास्त किमतीचे बॉन्ड्स किंवा म्युच्युअल फंड खरेदी करणे.

या परिस्थितीत दंड आकारला जाईल -

> पॅनऐवजी चुकीचा आधार क्रमांक देणे

> कोणत्याही प्रकारच्या व्यवहारासाठी पॅन व आधार दोन्ही क्रमांक न देणे

> आपण आधार क्रमांकासह बायोमेट्रिक ओळख न दिल्यास, ओळख अयशस्वी झाल्यास आपल्याला दंड भरावा लागेल. (हेही वाचा: PAN Card आता अवघ्या काही मिनिटांत आणि मोफत बनवता येणार; Income Tax विभागाकडून येत्या काही आठवड्यात सुरू होणार सेवा)

या व्यतिरिक्त हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की, जर आपण दोन फॉर्ममध्ये चुकीचा आधार आधार क्रमांक दिला, तर तुम्हाला प्रत्येकी 10-10 हजार रुपये म्हणजे 20 हजार रुपये दंड भरावा लागू शकतो. म्हणून, फॉर्म भरताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.