Bank Locker New Rules: RBI ने बदलले बँक लॉकरचे नियम; ग्राहकांना 'असा' मिळणार फायदा, वाचा सविस्तर
जर तुम्ही कोणत्याही बँकेत लॉकर उघडले असेल किंवा ते उघडण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे.
Bank Locker New Rules: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडून बँक ग्राहकांना लक्षात घेऊन नवीन नियम बनवले जात आहेत. नुकतेच केंद्रीय बँकेने कर्ज देण्याच्या नियमात बदल केल्यानंतर आता आरबीआयने बँक लॉकरचे नियम बदलले आहेत. जर तुम्ही कोणत्याही बँकेत लॉकर उघडले असेल किंवा ते उघडण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे.
1 जानेवारी 2022 पासून लागू झाले नियम -
रिझर्व्ह बँकेने अधिसूचना जारी करून म्हटले आहे की, नवीन बँक लॉकर नियम 1 जानेवारी 2022 पासून लागू केले जातील. बँकेत लॉकर घेणाऱ्या ग्राहकांच्या तक्रारीवरून आरबीआयने हे नियम जारी केले आहेत. नव्या नियमांच्या अंमलबजावणीचा थेट लाभ बँक ग्राहकांना मिळणार आहे. (हेही वाचा - SBI Recruitment 2022: एसबीआय मध्ये Specialist Cadre Officer साठी होणार नोकरभरती; sbi.co.in वर करा 4 मे पूर्वी अर्ज)
अनेकदा बँकेच्या लॉकरमध्ये चोरी झाल्याच्या तक्रारी येत होत्या. मात्र, आता बँकेच्या लॉकरमधून काही चोरीला गेल्यास संबंधित बँकेच्या वतीने ग्राहकाला लॉकर भाड्याच्या 100 पट भरपाई दिली जाईल. आतापर्यंत बँका चोरीच्या घटनांकडे दुर्लक्ष करून त्याला जबाबदार नसल्याचे सांगत होत्या.
डिस्प्लेवरून मिळणार रिकाम्या लॉकरची माहिती -
आरबीआयने आपल्या आदेशात असेही म्हटले आहे की, बँकांना रिकाम्या लॉकर्सची यादी, लॉकरसाठी प्रतीक्षा यादी क्रमांक प्रदर्शित करावा लागेल. यामुळे लॉकर सिस्टिममध्ये अधिक पारदर्शकता येण्याची अपेक्षा आहे. बँका ग्राहकांना अंधारात ठेवू शकत नाहीत, असे आरबीआयने म्हटले आहे. त्यांना योग्य माहिती मिळवण्याचा अधिकार आहे.
ई-मेल आणि एसएमएसद्वारे मिळणार अलर्ट -
आता जेव्हा तुम्ही तुमच्या लॉकरमध्ये प्रवेश कराल, तेव्हा तुम्हाला बँकेमार्फत ई-मेल आणि एसएमएसद्वारे अलर्ट केले जाईल. कोणत्याही प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी हा नियम आरबीआयने बनवला आहे. नवीन नियमांनुसार बँकांना लॉकर जास्तीत जास्त तीन वर्षांसाठी भाड्याने देण्याचा अधिकार आहे. जर तुमच्या लॉकरचे भाडे 2000 रुपये असेल तर बँक तुमच्याकडून इतर देखभाल शुल्क वगळता 6000 रुपयांपेक्षा जास्त आकारू शकत नाही.
सीसीटीव्ही फुटेज आवश्यक -
आता लॉकर रूममध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवणे आवश्यक असणार आहे. तसेच, सीसीटीव्ही फुटेजचा डेटा 180 दिवसांसाठी ठेवावा लागणार आहे. चोरी किंवा सुरक्षेत कोणतीही त्रुटी आढळल्यास आता पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून तपास करता येणार आहे.