1 नोव्हेंबर : या एकाच दिवशी तब्बल 7 राज्यांची झाली होती निर्मिती; पाहा कोणती आहेत ही राज्ये
भारतातील तब्बल 7 राज्यांची निर्मिती ही 1 नोव्हेंबर या दिवशी झाली आहे
आज 1 नोव्हेंबर, आजच्या दिवसाचे भारताच्या इतिहासात फार मोठे महत्व आणि योगदान आहे. विश्वास बसणार नाही पण, भारतातील तब्बल 7 राज्यांची निर्मिती ही 1 नोव्हेंबर या दिवशी झाली आहे. ही राज्ये आहेत कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, पंजाब, राजस्थान, हरियाणा आणि मध्य प्रदेश. वेगवेगळ्या वर्षी मात्र एकाच दिवशी या सात राज्यांना स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता मिळाली. चला तर पाहूया या राज्यांच्या निर्मिती मागे नक्की काय इतिहास दडला आहे.
कन्नड़ राज्योत्सव –
कर्नाटक राज्याची निर्मिती ही 1 नोव्हेंबर 1956 साली झाली. हे राज्य आज आपले 63वे निर्मिती वर्ष साजरे करीत आहे. 1950 नंतर जेव्हा भारत एक गणराज्य राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आले, तेव्हा भारतातील प्रत्येक राज्याची विभागणी ही भाषेच्या आधारावर करण्यात यावी अशी मागणी चोहोबाजूंनी जोर धरू लागली. पूर्वी कन्नड ही भाषा बोलणाऱ्या लोकांचे राज्य म्हैसूर म्हणून ओळखले जात होते. मात्र लोकाग्रहास्तव म्हैसूर हे नाव बदलून कर्नाटक करण्यात आले.
केरळ पिरवी -
‘Gods own country’ म्हणजेच केरळ हे राज्य 1 नोव्हेंबर 1956 साली स्वतंत्ररीत्या अस्तित्वात आले. प्रत्येकवर्षी हा दिवस मल्याळी लोक ‘केरळ पिरवी दिनम’ या नावाने साजरा करतात. भारताला स्वातंत्र्य मिळायच्या आधी म्हणजेच 1947च्या पूर्वी केरळ हे फक्त मलाबार, कोचीन आणि त्रवणकोर अशा तीन प्रांतांचा एक छोटा प्रदेश होता. त्यानंतर या तीनही प्रांतांना एकत्र जोडून स्वतंत्र केरळ राज्याची निर्मिती झाली. केरळदेखील यावर्षी आपले 63वे निर्मिती वर्ष साजरे करीत आहे.
छत्तीसगड -
1 नोव्हेंबर 2000 साली, मध्यप्रदेश पासून वेगळे होऊन छत्तीसगड या नवीन राज्याची निर्मिती झाली. वेगळ्या छत्तीसगडसाठी सर्वप्रथम मागणी 1920 साली करण्यात आली. 1924 च्या काँग्रेसच्या रायपूर अधिवेशनातसुद्धा ही मागणी उचलून धरण्यात आली होती. वेगळे झाल्यानंतर छत्तीसगड राज्याचे क्षेत्रफळ हे 135,194 स्के.किमी. इतके असून, राज्याची लोकसंख्या 25.5 मिलिअन इतकी आहे. छत्तीसगड राज्यात 27 जिल्हे असून, 5 विभाग बस्तर, बिलासपुर, दुर्ग, रायपूर आणि सुरगुजा यांमध्ये हे राज्य विभागले आहे. मध्यप्रदेशपासून वेगळे होऊनही छत्तीसगड हे भारतातील 10वे सर्वात मोठे राज्य आहे.
हरियाणा -
हरियाणा राज्यही 1 नोव्हेंबर रोजी आपला निर्मिती दिवस साजरा करीत आहे. 1966 साली हरियाणा आणि पंजाब अशी दोन स्वतंत्र राज्ये भारतात अस्तित्वात आली. वेगळे झाल्यानंतर हरियाणा भारतासाठी वरदान असल्याचे सिद्ध झाले. पीक उत्पादनाच्या संदर्भात हरियाणा येथे हरित क्रांती चळवळ सुरू झाली, ज्यामुळे भारताला धान्याचा मोठ्या प्रमाणात पुरवठा होऊ लागला. आज हरियानायेथील गुडगावचे 'मिलिनेनियम सिटी', आताचे गुरूग्राम हे एक महत्त्वाचे व्यवसाय केंद्र म्हणून ओळखले जाते. आज हरियाणा आपला 52वा निर्मिती दिन साजरा करत आहे.
पंजाब -
पंजाब हे भारताच्या वायव्येकडील एक महत्वाचे राज्य आहे. पंजाब पाच नद्यांचा प्रदेश म्हणून प्रसिद्ध आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर पंजाबी भाषकांचे एक स्वतंत्र राज्य असावे अशी मागणी अकाली दल नेता मास्टर तारासिंग यांनी केली होती. 1966 च्या के. टी. शाह आयोगाच्या शिफारशीनुसार हिंदी भाषिक प्रदेश हरयाणा व पंजाबी भाषिक प्रदेश पंजाबची निर्मिती करण्यात आली. तसेच या दोन्ही राज्यांची संयुक्त राजधानी म्हणून ‘चंदीगड या नियोजित शहराचा विकास व चंदीगडला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला.
राजस्थान -
राजस्थान (जुने नाव राजपुताना) हे उत्तरी भारतातील एक राज्य आहे. हे राज्य आपल्या प्राचीन इतिहासाची व ऐतिहासिक किल्यांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. 1 नोव्हेंबर, 1956 रोजी राजस्थान राज्याची पुनर्रचना करण्यात आली, त्यानुसार सध्याच्या राजस्थानची विभागणी झाली आहे.
मध्य प्रदेश -
भारतातील मध्य प्रदेश हे राज्य, भाषावार प्रांतरचनेनंतर 1 नोव्हेंबर इ.स. 1956ला बनवले गेले. त्यानंतर, 1 नोव्हेंबर इ.स. 2000 ला पुन्हा त्यातून छत्तीसगढ हा विभाग वेगळा होऊन त्याचे स्वतंत्र राज्य निर्माण केले गेले. क्षेत्रफळाच्यादृष्टीने मध्यप्रदेश हे 2 रे सर्वात मोठे राज्य आहे.