Gadchiroli Bandh: जिल्ह्यात हिंसाचार; लाकडी डेपोमधील ट्रकला आग, झाडे तोडून वाहतूक केली ठप्प
माओवाद्यांनी शनिवारी रात्री लाकडी डिपोमध्ये उभ्या असलेल्या ट्रकला आग लावून, पोस्टरबाजी केली. या गोष्टीमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.
गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यात सध्या वातावरण चांगलेच तापले आहे. माओवाद्यांनी दिलेल्या ‘गडचिरोली बंद’ (Gadchiroli Bandh) हाकेला हिंसक वळण लागले आहे. नक्षलवाद्यांनी रस्त्यावरील झाडे तोडून वाहतूक मार्ग पूर्णपणे ठप्प केले आहेत. एटापल्ली आलापल्ली मार्गांवरील झाडे तोडून रस्ते अडवल्याने बस वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. काल रात्रीपासून या हिंसाचाराला सुरुवाला झाली. माओवाद्यांनी शनिवारी रात्री लाकडी डेपोमध्ये उभ्या असलेल्या ट्रकला आग लावून, पोस्टरबाजी केली. या गोष्टीमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.
27 एप्रिल रोजी झालेल्या चकमकीत दोन महिला नक्षलद्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर 1 मे रोजी, नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला, ज्यामध्ये 15 सी-60 जवान शहीद झाले होते. दुसऱ्या दिवशी माओवाद्यांनी ठिकठिकाणी पोस्टर लावून गडचिरोलीमध्ये रस्ते आणि पूल बांधू असे सांगितले होते. शेवटी 19 बंद रोजी ‘गडचिरोली बंद’ची घोषणा केली. सध्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये तसेच तीन राज्यांच्या सीमेवरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. (हेही वाचा: गडचिरोली जिल्ह्यात तसेच तीन राज्यांच्या सीमाभागात हाय अलर्ट जारी; तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत वाढ)
काही दिवसांपूर्वी छत्तीसगडच्या दक्षिण बस्तर (Bastar)_ येथे पोलिसांसोबत झालेल्या चकमकीविरोधात, नक्षलवाद्यांनी बंदची घोषणा केली होती. त्यावेळीही अशीच वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांना संकटांचा सामना करावा लागला होता.