कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या ATM Withdrawal Facility ची प्रतिक्षा कायम; पहा काय होणार फायदा
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) एटीएम आणि यूपीआयद्वारे पीएफ रक्कम काढण्याच्या सुविधेची चाचणी पूर्ण झाली असून नियामक मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे, मात्र अद्याप अधिकृत प्रारंभ तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आता कर्मचार्यांना त्यांच्या पीएफ चे पैसे सुलभपणे काढता येण्यासाठी मोठ्या बदलांची घोषणा केली आहे. सध्या EPFO एटीएम आणि यूपीआयद्वारे पीएफ रक्कम काढण्याच्या महत्त्वाकांक्षी सुविधेवर काम करत आहे. या प्रकल्पाला वारंवार मुदतवाढ मिळाली असून, प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्याप सुरू झालेली नाही. जून 2025 मध्ये ही सुविधा सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले होते, मात्र त्यानंतर मे 2026, जून2026 अशा वेगवेगळ्या मुदती देण्यात आल्या. सद्यस्थितीत या सुविधेची तांत्रिक चाचणी पूर्ण झाली असून, अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी थांबलेली आहे.
EPFO 3.0 प्रकल्पाची पार्श्वभूमी
केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झालेल्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या (सीबीटी) बैठकीत EPFO 3.0 या डिजिटल अपग्रेडला औपचारिक मंजुरी देण्यात आली होती. या नव्या प्रणालीअंतर्गत सदस्यांना बँकेच्या डेबिट कार्डप्रमाणे काम करणारे स्वतंत्र पीएफ विथड्रॉवल कार्ड दिले जाणार आहे, ज्याद्वारे एटीएममधून थेट पैसे काढता येतील.
राष्ट्रीय देयक महामंडळाच्या सहकार्याने ही यंत्रणा विकसित करण्यात येत असून, आधार-आधारित ओटीपी पडताळणीद्वारे व्यवहार अधिकृत केले जातील. सदस्यांना युपीआय ॲप्सवरही ही सुविधा उपलब्ध होणार आहे.
सद्यस्थितीतील मर्यादा आणि नियम
अहवालांनुसार, एटीएमद्वारे सदस्य आपल्या पीएफ शिल्लकीच्या जास्तीत जास्त 50 टक्के रक्कम काढू शकतील, तर यूपीआयद्वारे ही मर्यादा 75 टक्क्यांपर्यंत असू शकते. सेवाकाळात खात्यात किमान 25 टक्के शिल्लक कायम राखणे बंधनकारक असणार आहे, जेणेकरून सेवानिवृत्तीनंतरच्या बचतीला संरक्षण मिळेल. नक्की वाचा: एकाच वेळी दोन नोकऱ्या करताय? जाणून घ्या कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटना खात्याचे नियम काय सांगतात.
ही सुविधा वापरण्यासाठी सदस्यांचा युएएन आधार, पॅन आणि बँक खात्याशी जोडलेला आणि पडताळणीकृत असणे आवश्यक आहे. केवायसी पूर्ण नसल्यास दावा प्रक्रियेत विलंब होऊ शकतो, असे ईपीएफओने स्पष्ट केले आहे. नक्की वाचा: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खाते कधी 'निष्क्रिय' होते? वेळीच समजून घ्याव्यात या 4 महत्त्वाच्या बाबी .
आधीच लागू झालेले बदल
एटीएम आणि यूपीआय विथड्रॉवल सुविधेची प्रत्यक्ष सुरुवात प्रलंबित असली, तरी EPFO 3.0 अंतर्गत काही सुधारणा आधीच लागू करण्यात आल्या आहेत. स्वयंचलित दावा निपटाऱ्याची मर्यादा 1 लाख रुपयांवरून 5 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली असून, यामुळे सुमारे 95 टक्के दावे आता कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय निकाली निघत आहेत. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये ईपीएफओने 8.31 कोटी दावे निकाली काढले, जे मागील वर्षीच्या 6.01 कोटींच्या तुलनेत लक्षणीय वाढ दर्शवते.
1 एप्रिल 2026 पासून टीडीएस सवलतीसाठी फॉर्म १५जी आणि १५एच ऐवजी नवा फॉर्म १२१ लागू करण्यात आला आहे. नवीन ईपीएफ योजना आणि ईपीएफओ ३.० चे नियम २९ जून २०२६ पासून अधिकृतपणे अंमलात आले आहेत, मात्र यात एटीएम-यूपीआय विथड्रॉवलचा प्रत्यक्ष प्रारंभ समाविष्ट नाही.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना सदस्यांसाठी सूचना
अधिकृत तारीख जाहीर होण्याची प्रतीक्षा असताना, ईपीएफओने सदस्यांना त्यांचा युएएन आधार, पॅन आणि बँक खात्याशी अद्ययावत आणि पडताळणीकृत ठेवण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून सुविधा सुरू झाल्यानंतर तात्काळ लाभ घेता येईल. सुविधेच्या अंतिम प्रारंभाबाबतची माहिती ईपीएफओ पोर्टल आणि उमंग ॲपवर टप्प्याटप्प्याने जाहीर केली जाईल, असे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.