Aadhaar ते DigiLocker प्रत्येक भारतीयाच्या फोनमध्ये असायला हवीत ही 5 सरकारी अ‍ॅप्स

सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या आणि कागदपत्रांच्या गोंधळातून सुटका हवी असल्यास डिजीलॉकर, एम आधार, उमंग, भीम आणि आभा या पाच सरकारी अ‍ॅप्स प्रत्येक भारतीयाच्या स्मार्टफोनमध्ये असणे आवश्यक आहे.

Aadhaar ते DigiLocker प्रत्येक भारतीयाच्या फोनमध्ये असायला हवीत ही 5 सरकारी अ‍ॅप्स
Mobile Phone फोटो सौजन्य - Pixabay

 डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत विकसित करण्यात आलेल्या काही सरकारी अ‍ॅप्समुळे नागरिकांना घरबसल्या अनेक सेवा उपलब्ध झाल्या आहेत. सरकारी कामांसाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवणे, रांगेत तासनतास उभे राहणे आणि कागदपत्रांची जुळवाजुळव करणे ही प्रक्रिया आता पूर्वीच्या तुलनेत थोडी सोप्पी झाली आहे. मग रोजच्या व्यवहारांंसाठी आवश्यक अशा डिजीलॉकर (DigiLocker) पासून एम आधारपर्यंत (Aadhaar App), अशाच पाच महत्त्वाच्या अ‍ॅप्सची माहिती नक्की जाणून घ्या.

डिजीलॉकर : कागदपत्रांची डिजिटल तिजोरी

डिजीलॉकर हे भारतातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या सरकारी अ‍ॅप्सपैकी एक आहे. या अ‍ॅपमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आरसी बुक), शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि विमा कागदपत्रे यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे डिजिटल स्वरूपात सुरक्षितरित्या साठवता येतात. माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत डिजीलॉकरमध्ये साठवलेली किंवा जारी केलेली डिजिटल कागदपत्रे मूळ प्रतींइतकीच कायदेशीरदृष्ट्या वैध मानली जातात. यामुळे भौतिक कागदपत्रे सोबत बाळगण्याची गरज उरत नाही.

उमंग : सर्व सरकारी सेवा एकाच ठिकाणी

उमंग (युनिफाइड मोबाइल अ‍ॅप्लिकेशन फॉर न्यू-एज गव्हर्नन्स) हे एक 'सुपर अ‍ॅप' असून, यावर ३०० हून अधिक सरकारी विभागांच्या सेवा एकत्रितपणे उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या सरकारी विभागांसाठी स्वतंत्र अ‍ॅप्स डाउनलोड करण्याऐवजी, उमंगच्या माध्यमातून ईपीएफओ, पेन्शन, पासपोर्ट सेवा, गॅस बुकिंग, वीज-पाणी बिल भरणा आणि शिक्षण-आरोग्यविषयक सेवांचा लाभ एकाच व्यासपीठावरून घेता येतो.

भीम : सुरक्षित डिजिटल व्यवहारांसाठी

भीम (BHIM) भारत इंटरफेस फॉर मनी हे सरकार-समर्थित यूपीआय अ‍ॅप असून, याद्वारे बँक खात्यांदरम्यान सुरक्षित आणि तत्काळ डिजिटल व्यवहार करता येतात. रोकडविरहित व्यवहारांना चालना देण्याच्या उद्देशाने हे अ‍ॅप विकसित करण्यात आले असून, दैनंदिन आर्थिक व्यवहारांसाठी ते अत्यंत उपयुक्त ठरते.

एम आधार : आधारशी संबंधित सेवा फोनवरच

एम आधार अ‍ॅपमुळे आधारशी संबंधित माहिती आणि सेवा थेट स्मार्टफोनवरून उपलब्ध होतात. याद्वारे आधार तपशील पाहणे, ओळख पडताळणी करणे आणि इतर संबंधित कामे सहजपणे करता येतात. अनेक पडताळणी प्रक्रियांसाठी हे अ‍ॅप स्वीकारले जाते, मात्र काही ठिकाणी संबंधित प्राधिकरणांच्या स्वतंत्र अटी असू शकतात.

आभा : डिजिटल आरोग्य ओळखपत्र

आभा (आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट) हे एक विशेष डिजिटल हेल्थ आयडी असून, याद्वारे नागरिकांना आपले आरोग्यविषयक रेकॉर्ड्स सुरक्षितपणे साठवता आणि व्यवस्थापित करता येतात. वैद्यकीय इतिहास, तपासणी अहवाल आणि उपचारांच्या नोंदी एकाच ठिकाणी उपलब्ध असल्याने, आरोग्यसेवा घेताना ही कागदपत्रे शोधण्याची कटकट राहत नाही.

डाउनलोड करताना घ्यावयाची काळजी

ही सर्व अ‍ॅप्स मोफत उपलब्ध असून, ती केवळ गुगल प्ले स्टोअर किंवा अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवरूनच डाउनलोड करावीत. अ‍ॅप डाउनलोड करण्यापूर्वी संबंधित प्रकाशक अधिकृत सरकारी संस्था असल्याची खात्री करणे आवश्यक आहे, जेणेकरून बनावट किंवा असुरक्षित अ‍ॅप्सपासून बचाव करता येईल.

एकूणच, ही पाच अ‍ॅप्स स्मार्टफोनमध्ये असल्यास सरकारी कामे, कागदपत्रांची व्यवस्था, आर्थिक व्यवहार आणि आरोग्यविषयक नोंदी यासाठी वारंवार कार्यालयांत जाण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी होते.

(The above story first appeared on LatestLY on Aug 13, 2026 01:41 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).