8th Pay Commission: एका झटक्यात बदलणार पगार! 8 व्या वेतन आयोगावर मोठी अपडेट, सणासुदीच्या तोंडावर केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना देणार बंपर गिफ्ट?
केंद्र सरकारकडून आगामी सणासुदीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ ते ४ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात असून, त्यामुळे डीए ६४ टक्क्यांवर पोहोचू शकतो. त्याच वेळी ८ व्या वेतन आयोगाच्या शिफारशींवरही चर्चा वेगाने सुरू आहेत.
8th Pay Commission: केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी सणासुदीच्या तोंडावर मोठी दिलासादायक बातमी येण्याची चिन्हे आहेत. १ जुलैपासून लागू होणाऱ्या वर्षातील दुसऱ्या महागाई भत्ता (DA) वाढीची प्रतीक्षा अंतिम टप्प्यात पोहोचली असून, यावेळी डीएमध्ये ३ ते ४ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना ६० टक्के दराने महागाई भत्ता मिळत असून, संभाव्य वाढीनंतर हा आकडा ६३ किंवा ६४ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो.
कशाच्या आधारावर वाढणार महागाई भत्ता?
केंद्र सरकार वर्षातून दोन वेळा, जानेवारी आणि जुलैमध्ये महागाई भत्त्याचा आढावा घेते. जानेवारीमध्ये २ टक्क्यांची वाढ करून भत्ता ६० टक्के करण्यात आला होता. आता जुलैपासून लागू होणारा नवा दर औद्योगिक कामगारांसाठीच्या ग्राहक मूल्य निर्देशांकाच्या (AICPI-IW) आकडेवारीवर निश्चित केला जातो.
लेबर ब्युरोने जाहीर केलेल्या अलीकडील आकडेवारीनुसार, औद्योगिक महागाई निर्देशांकात १.३ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली असून निर्देशांक १५३.२ अंकांवर पोहोचला आहे. महागाईतील या चढत्या आलेखाचा विचार करता कर्मचाऱ्यांना किमान ३ ते कमाल ४ टक्क्यांची डीए वाढ मिळण्याची दाट शक्यता आहे.
पगारावर काय परिणाम होणार?
जर सरकारने महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ मंजूर करून तो ६४ टक्के केला, तर कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात लक्षणीय फरक पडेल:
१८,००० रुपये मूळ वेतन: सध्या मिळणाऱ्या १०,८०० रुपयांऐवजी ११,५२० रुपये डीए मिळेल.
२५,५०० रुपये मूळ वेतन: महागाई भत्त्याची रक्कम १५,३०० रुपयांवरून थेट १६,३२० रुपयांवर जाईल.
३५,४०० रुपये मूळ वेतन: २१,२४० रुपयांऐवजी कर्मचाऱ्यांना २२,६५६ रुपये मासिक डीए लागू होईल.
४४,९०० रुपये मूळ वेतन: भत्त्याची रक्कम २६,९४० रुपयांवरून २८,७३६ रुपये इतकी होईल.
याशिवाय जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांची थकबाकी (Arrears) कर्मचाऱ्यांच्या खात्यात ऑक्टोबरच्या वेतनासोबत जमा होण्याची शक्यता आहे.
८ व्या वेतन आयोगाबाबत सध्याची स्थिती
डीए वाढीसोबतच लाखो कर्मचाऱ्यांचे लक्ष ८ व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशींकडेही लागले आहे. वेतन आयोगाचे कामकाज सध्या विविध टप्प्यांवर सुरू असून कर्मचारी संघटनांशी सल्लामसलत केली जात आहे.
कर्मचारी युनियन्सकडून फिटमेंट फॅक्टर २.५७ वरून थेट ३.८३ पर्यंत वाढवण्याची प्रमुख मागणी लावून धरण्यात आली आहे. जर सरकारने ही मागणी मान्य केली, तर कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन १८,००० रुपयांवरून थेट सुमारे ६८,००० रुपयांपर्यंत पोहोचू शकते. आयोगाचा अहवाल सादर झाल्यानंतर आणि केंद्रीय मंत्रिमंडळाने त्यास मंजुरी दिल्यानंतरच नव्या वेतन रचनेची अधिकृत अंमलबजावणी स्पष्ट होईल.