Gujarat Rich Thief: गुजरातच्या श्रीमंत चोराला अटक, लाईफस्टाईल पाहून पोलिसांनाही बसला धक्का
इतकंच नाही तर चक्क विमानाने प्रवास करायचा. चौकशीदरम्यान त्याने आतापर्यंत 19 चोऱ्या केल्याचे मान्य केले.
गुजरातमधील एका चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. वापीत एक लाख रुपये चोरीच्या प्रकरणात त्याला अटक झाली होती. या अटकेनंतर आरोपीच्या चौकशीत ज्या गोष्टींच्या उलगडा झाला आहे. पोलिसांनी चोराची माहिती मिळवली असता त्यांना धक्काच बसला. याचं कारण तो साधासुधा नाही तर करोडपती चोर होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रोहित सोलंकी आलिशान हॉटेल्समध्ये वास्तव्य करायचा. इतकंच नाही तर चक्क विमानाने प्रवास करायचा. चौकशीदरम्यान त्याने आतापर्यंत 19 चोऱ्या केल्याचे मान्य केले. एवढंच नाही तर रोहित सोलंकी हा मुंबईत एक कोटी किंमतीच्या फ्लॅटमध्ये राहत असून त्याच्याकडे आलिशान ऑडी कार असल्याचेही चौकशीतून समोर आले. (हेही वाचा - Fake Job Scam in Maharashtra: नोकरी घोटाळा, तोतया RPF जवानास अटक; खोटी नाकरी, खोटे प्रशिक्षण)
रोहित सोलंकीने अनेक राज्यांमध्ये चोऱ्या केल्या असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. गेल्या महिन्यात त्याने वापीमध्ये 1 लाखांची चोरी केली होती. याप्रकरणी पोलीस तपास करत होते. तसंच चोराची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत होते. त्यांने वलसाड येथे तीन, सुरतमध्ये एक, पोरबंदर आणि सेलवल येथे एक, तेलंगणा, आंद्रप्रदेश आणि मध्यप्रदेशात प्रत्येकी दोन चोऱ्या केल्या होत्या. तर महाराष्ट्रातही एक चोरी केली असल्याचे कबुली रोहितने दिली.
रोहित सोलंकी आलिशान हॉटेलमध्ये वास्तव्य करायचा. तसेच विमानाने प्रवास करायचा. हॉटेलमध्ये वास्तव्यास असताना तो हॉटेलची गाडी बुक करून दिवसा प्रवास करत असे. चोरीची योजना आखण्यासाठी तो दिवसा नागरी सोसायटींची पाहणी करायचा. चोरीच्या पैशांतून चैनीत जगण्याची सोलंकीला सवय जडली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील नाईटक्लबमध्ये तो नेहमीच जात असे.