लग्नपत्रिकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी मतं देण्याचे अपील करणे पडले महागात, निवडणुक आयोगाकडून परिवाराला नोटिस
उत्तराखंड येथील बागेश्वर मध्ये लग्नाच्या पत्रिकेवर परिवाराने भाजप पक्षाचे निवडणुकीचे चिन्ह छापून त्यांच्यासाठी मत देण्याचे अपील केले होते.
उत्तराखंड येथील बागेश्वर मध्ये लग्नाच्या पत्रिकेवर परिवाराने भाजप पक्षाचे निवडणुकीचे चिन्ह छापून त्यांच्यासाठी मत देण्याचे अपील केले होते. मात्र अशा पद्धतीने मतासाठी अपील करणे परिवाराला महागात पडले असून निवडणुक आयोगाने त्यांना नोटिस पाठवून 24 तासाच्या आतमध्ये उत्तर देण्यास सांगितले आहे. तर आचार संहितेचे उल्लंघन केल्याने याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बागेश्वर येथील ही घटना आहे. गरुड विकास खंड गावातील जोशीखाला येथे राहणाऱ्या जगदीश जोशी ह्यांचा मुलगा जीवन जोशी ह्याचे लग्न 22 एप्रिल रोजी आहे. तर मुलाच्या लग्नाचे आमंत्रणसाठी लग्नपत्रिका छापल्या आहेत. परंतु त्यामध्ये भाजपचे चिन्ह आणि भाजपला मत देण्यासाठी सांगितले आहे. त्यामुळे निवडणुक आयोगाने ही बाब गंभीर असल्याने आदर्श आचार संहितेचे उल्लंघन केल्याचे म्हटले आहे.
जगदीश जोशी ह्यांनी छापलेल्या लग्नपत्रिकेत असे लिहिले आहे की, लग्नात गिफ्ट आणू नये परंतु वधुवराला आशीर्वाद देण्यापूर्वी 11 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी नरेंद्र मोदी यांनाच मतं द्या. तसेच लग्नपत्रिकेवर स्वच्छ भारत आणि स्वस्थ भारत याचा लोगो सुद्धा लावण्यात आला आहे. तर निवडणुक आयोगाने पाठवलेल्या नोटिसमुळे परिवार चिंतेत आहे. तसेच मीडियाला याबद्दल प्रतिक्रिया देण्यास जोशी यांनी नकार दिला आहे.