'फेसबुक'कडून कॉंग्रेस पक्षावर मोठी कारवाई; आयटी सेलशी संबंधित असलेली 687 पेजेस हटवली
आक्षेपार्ह भाषेचा वापर, जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरवणे अशा कारणांमुळे ही कारवाई केली गेली आहे.
लोकसभा निवडणुका (Lok Sabha Elections) तोंडावर आल्या असताना फेसबुक (Facebook) ने कॉंग्रेस (Congress) वर मोठी कारवाई केली आहे. काँग्रेस पक्षाच्या ‘आयटी’ सेलशी निगडित असणाऱ्या सुमारे 687 फेसबुक पेजेस बंद करण्यात आले आहेत. आक्षेपार्ह भाषेचा वापर, जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरवणे अशा कारणांमुळे ही कारवाई केली गेली आहे. तसेच पाकिस्तानी सैन्याच्या कर्मचाऱ्यांशी संबंधित 103 फेसबुक खातीही डिलीट करण्यात आली आहेत. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारची कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ आहे. फेसबुकचे सायबर सेक्युरिटी प्रमुख नथॅनियल ग्लेशर यांनी या कारवाईबाबत माहिती दिली आहे.
काँग्रेसशी संबंधित असणाऱ्या काही फेसबुक पेजेसवरून जाणीवपूर्वक विरोधी पक्षांबाबत तसेच सत्ताधारी भाजप बाबत चुकीची माहिती पुरवली जात असल्याचे फेसबुकने हे पाऊल उचलले आहे. ‘आमच्या स्वयंचलिक प्रणालीने आधीच हेरलेल्या आणि निलंबित केलेल्या सुमारे 687 फेसबूक अकाऊंट्स आणि पेजेसवर आम्ही कारवाई करताना ही पेजेस आणि अकाऊंट्स हटवली आहेत. ही पेजेस आणि अकाऊंट्स वैयक्तिकरीत्या काँग्रेसच्या आयटी सेलशी निगडित होती,’ असे फेसबुकने या कारवाईूबाबत माहिती देताना म्हटले आहे. (हेही वाचा: लोकसभा निवडणूकीसाठी 'फेसबूक'ही सज्ज; 'Candidate Connect' आणि 'Share You Voted' ही दोन नवी टूल्स देणार मतदारांना माहिती)
फेसबुकचे भारतात सर्वाधिक, म्हणजे 30 कोटी युजर्स आहेत. त्यामुळे देशातील इतक्या मोठ्या पक्षाबाबत अशा प्रकारची कारवाई होणे ही गंभीर बाब आहे. अनेक व्यक्ती फेक अकाउंट्सद्वारे विविध ग्रुपमध्ये, पेजेसवर सक्रीय आहेत. या पेजेसवर जाणूनबुजून मोदींच्या बाबत चुकीची माहिती पसरवली जात आहे. ही अकाउंट्स काँग्रेसच्या आयटी सेलशी जोडलेली आहेत, त्यामुळे फेसबुकने ही कारवाई केली आहे.