'इलेक्शन किंग' के. पद्मराजन लढत आहेत आपली 201वी निवडणूक; राहुल गांधी यांच्या विरुद्ध होणार लढत
पद्मराजन (K Padmarajan) यांनी आपल्या 201 व्या निवडणुकीसाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल आहे
या लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election) फक्त नवीन सरकार निवडण्यासाठीच महत्वाच्या नाहीत, तर अनेक नवे विक्रम करण्यासाठीही महत्वाच्या आहेत. अशी एक व्यक्ती आहे जी या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आयुष्यातील 201 वी निवडणूक लढवत आहे. होय, तामिळनाडू राज्यातील सालेम (Salem) येथील के. पद्मराजन (K Padmarajan) यांनी आपल्या 201 व्या निवडणुकीसाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल आहे. सर्वात महत्वाच्या म्हणजे के. पद्मराजन आतापर्यंत एकही निवडणूक जिंकले नाहीत, तरी त्यांना ‘इलेक्शन किंग’ म्हणून ओळखले जाते.
सर्वात अयशस्वी व सर्वात जास्त निवडणुका लढविणारा उमेदवार म्हणून लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड (Limca Book of World Records) ने याची दाखल घेतली आहे. आता के. पद्मराजन यांना गिनीज बुकात आपल्या नावाची नोंद करायची आहे. एक सामान्य मनुष्यही मोठमोठ्या लोकांच्या साथीने निवडणुका लढवू शकतो हे के. पद्मराजन यांना सिद्ध करायचे होते.
60 वर्षीय के. पद्मराजन यांनी 1988 साली सर्वप्रथम उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पुढे 1996 साली त्यांनी तब्बल 8 जागांवरून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने ही मर्यादा फक्त 2 जागेंपुरती मर्यादित ठेवली. 1991 साली जेव्हा त्यांनी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री पीव्ही नरसिंहराव यांच्याविरुद्ध अर्ज दाखल केला होता, तेव्हा चक्क त्यांचे अपहरण करण्यात आले होते. करुणानिधी, जयललिता, एस. एम. कृष्णा, बंगारप्पा, एच. डी. कुमारस्वामी यांसारख्या मोठ मोठ्या व्यक्तींच्या विरोधात त्यांनी निवडणुका लढवल्या आहेत. (हेही वाचा: वायनाड: राहुल गांधी यांचा रोड शो सुरु असतना ट्रकचा रॉड तुटला; पत्रकार जखमी)
गेल्या 30 वर्षांत निवडणुकांवर त्यांनी 30 लाख रुपये खर्च केले आहेत. पद्मराजन यांना आतापर्यंत सवाधिक 6723 मते 2011 साली मेत्तूर विधानसभा मतदारसंघात मिळाली होती. यावर्षी त्यांनी तामिळनाडूतील धर्मापुरी मतदारसंघातून आणि त्यानंतर आता वायनाड येथून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.