UPSC Exams 2020: यूपीएससी च्या पूर्व, मुख्य परीक्षा देणार्‍यांना परीक्षा केंद्रामध्ये बदल करता येणार; upsconline.nic.in वर अशी आहे प्रक्रिया

त्यासाठी अनेकांनी परीक्षा केंद्रात बदल करण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर आता हा युपीएससीकडून निर्णय घेण्यात आला आहे.

UPSC | Representational Image (Photo Credits: PTI)

भारतातील कोरोना व्हायरसची स्थिती पाहता संघ लोक सेवा आयोग (Union Public Service Commission ) कडून यंदा उमेदवारांना यूपीएससी  पूर्व परीक्षासाठी (Civil Services Preliminary Examination) परीक्षा केंद्रामध्ये बदल करण्याची मुभा देण्यात आली आहे. दरम्यान यासोबतच सिव्हिल सर्व्हिसच्या मुख्य परीक्षांच्या विद्यार्थ्यांनाही केंद्रामध्ये बदल करण्याची आता संधी मिळणार आहे. देशभरातून लाखो विद्यार्थी या परीक्षेसाठी तयारी करत असतात. त्यांच्यासाठी आता ही मोठी दिलासादायक बातमी आहे. अनेक विद्यार्थी युपीएससीची परीक्षा देण्यासाठी दिल्ली सारख्या मोठ्या शहरात जातात. मात्र लॉकडाऊनमध्ये अनेकजण मूळ घरी परतले आहेत. अशा विद्यार्थ्यांना आता त्यांच्या नजिकच्या सेंटरची परीक्षा केंद्र म्हणून निवड करता येणार आहे.

यंदा यूपीएससीची पूर्वपरीक्षा 4 ऑक्टोबरला होणार आहे. त्यासाठी अनेकांनी परीक्षा केंद्रात बदल करण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर आता हा युपीएससीकडून निर्णय घेण्यात आला आहे. या पूर्वपरीक्षेसोबतच Indian Forest Service च्या पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेच्या विद्यार्थांनाही त्यांच्या परीक्षा केंद्रामध्ये बदल करता येणार आहे.

परीक्षा केंद्र बदलण्यासाठी upsconline.nic.in या संकेतस्थळावर दोन टप्प्यामध्ये विंडो उघडल्या जाणार आहेत. पहिला टप्पा 7 ते 13 जुलै 2020 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असेल. तर दुसरा टप्पा 20-24 जुलै संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे. ऑनलाईन माध्यमातून हे बदल करता येणार आहेत.

परीक्षा केंद्र बदल मध्ये प्रथम येणार्‍यास प्राधान्य हे तत्त्व अवलंबलं जाणार आहे. एखाद्या केंद्राची क्षमता संपली तर ते पुढील विद्यार्थ्यांसाठी बंद केले जाईल. तर विद्यार्थ्यांसाठी 1 ते 8 ऑगस्ट दरम्यान आर्ज मागे घेण्यासाठी देखील अधिकृत संकेतस्थळावर खास विंडो ओपन केली जाणार आहे. मात्र एकदा अर्ज मार्ग घेतल्यास तो पुन्हा स्विकारला जाणार नाही.

यंदा युपीएससीची पूर्व परीक्षा 31 मे दिवशी नियोजित होती. मात्र कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता आता ही परीक्षा 4 ऑक्टोबर पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.