NEET (UG) 2021: 12 सप्टेंबर 2021 रोजी आयोजित केली जाणार नीट (यूजी) 2021; उद्या संध्याकाळी 5 वाजल्यापासून सुरु होणार अर्ज प्रक्रिया
नीट (यूजी) परीक्षेत देशभरातून सरासरी 10 लाखाहून अधिक विद्यार्थी सहभागी होतात. मागील वर्षाच्या या परीक्षेसाठी 14 लाखाहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली होती.
अखेर नीट परीक्षेच्या (NEET (UG) 2021) तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सोमवारी याबाबत घोषणा केली आहे. शिक्षणमंत्र्यांनी ट्विट केले आहे की, नीट (यूजी) 2021 परीक्षा 12 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. यावेळी कोविड-19 प्रोटोकॉलचे पूर्णतः पालन केले जाईल असे सांगितले. अर्ज करण्याची प्रक्रिया मंगळवारपासून एनटीएच्या वेबसाइटवर सुरू होईल. यापूर्वी नीट यूजी परीक्षा 2021 देशातील 155 शहरांमध्ये घेण्यात येणार होती, आता ती देशभरातील 198 शहरांमध्ये आयोहित केली जाणार आहे.
2020 मध्ये नीट परीक्षा 3862 केंद्रांवर घेण्यात आली, यंदा केंद्रांच्या संख्येमध्येही वाढ केली जाणार आहे. उद्या संध्याकाळी 5 वाजल्यापासून एनटीएच्या संकेतस्थळांमार्फत परीक्षेची अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे. कोविड-19 प्रोटोकॉलचे पालन सुनिश्चित करण्यासाठी केंद्रातील सर्व उमेदवारांना फेस मास्क प्रदान केला जाईल. प्रवेश आणि निर्गमन दरम्यान वेळ स्लॉट, संपर्क रहित नोंदणी, योग्य सॅनिटायझेशन, सामाजिक अंतरावर बसण्याची सुविधा इत्यादी गोष्टीदेखील सुनिश्चित केल्या जातील.
नीट परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थी देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस, बीडीए, बीएएमएससह विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊ शकतील. नीट (यूजी) परीक्षेत देशभरातून सरासरी 10 लाखाहून अधिक विद्यार्थी सहभागी होतात. मागील वर्षाच्या या परीक्षेसाठी 14 लाखाहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली होती.
दरम्यान, याआधी जेईई परीक्षेच्या (JEE Main Examination 2021) तिसर्या व चौथ्या टप्प्यातील तारखांची घोषणा केली गेली होती. तिसर्या टप्प्यातील परीक्षा जुलै महिन्यात 20 ते 25 या कालावधीत घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर, चौथ्या टप्प्यातील परीक्षा जुलै महिन्यात 27 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान घेण्यात येतील.