NEET PG 2021: NBE ने नीट पीजी परीक्षेसाठी जारी केले मार्गदर्शक तत्त्वे; विद्यार्थ्यांना पाळावे लागणार 'हे' नियम
सेफ्टी किटमध्ये फेस मास्क, फेस शील्ड आणि पाच सेनिटायझर्स असतील.
NEET PG 2021: नेशनल एलिजिबिलिटी कम एंट्रेंस टेस्ट-पोस्ट ग्रेजुएट ( National Eligibility cum Entrance Test -Postgraduate, NEET PG 2021), नीट पीजी परीक्षा 2021 साठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय परीक्षा मंडळाने (एनबीई) संपूर्ण देशभरातील कोरोना विषाणूचा संसर्ग लक्षात घेता देशभरातील परीक्षा केंद्रांची संख्या वाढविली आहे. जेणेकरून परीक्षेदरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात येईल. ही परीक्षा देशभरातील 255 शहरांमध्ये घेण्यात येणार आहे. याखेरीज एनबीईने विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी इतर राज्यांत जाण्यापासून वाचविण्यासाठी त्यांच्याच राज्यात सेंटर देण्याचा प्रयत्न केला आहे.
कोरोना संसर्गात वाढ झाल्याने देशातील बर्याच राज्यांत प्रवासासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे एनबीई प्रत्येक उमेदवाराला कोविड ई-पास देणार आहे. जो उमेदवारांना हॉल तिकिटासोबत उपलब्ध करुन देण्यात येईल, जेणेकरून उमेदवारांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यास त्रास होणार नाही. (वाचा - CBSE Board Exams 2021: सीबीएसई च्या 10वी, 12वीच्या परीक्षा लांबणीवर टाकण्याचा, रद्द करण्याचा अद्याप विचार नाही, बोर्डाच्या अधिकार्यांची माहिती)
दरम्यान, परीक्षा केंद्रात गर्दी होऊ नये, यासाठी नीट पीजी 2021 परीक्षा वेगवेगळ्या शिफ्टमध्ये घेण्यात येत आहे. त्यामुळे उमेदवारांना ठरलेल्या वेळेनुसार, विहित नीट पीजी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे लागेल. यासंदर्भात परीक्षा प्राधिकरण उमेदवाराला त्याच्या परीक्षा शिफ्टबद्दल ईमेल व एसएमएसद्वारे माहिती देईल.
नीट 2021 पीजी परीक्षेस बसणारे उमेदवार पूर्णपणे निरोगी आहेत, हे सुनिश्चित करण्यासाठी उमेदवारांनी परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी थर्मल स्कॅनिंग करणे आवश्यक आहे. जर एखाद्या उमेदवारामध्ये थर्मल स्क्रिनिंगमध्ये सामान्य तापमान किंवा कोविडची कोणतीही लक्षणे आढळल्यास त्या उमेदवाराला स्वतंत्र लॅबमध्ये नीट पीजी परीक्षा 2021 मध्ये उपस्थित रहावे लागेल.
एनबीईने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, नीट पीजी परीक्षा केंद्रात प्रवेश घेतल्यानंतर प्रत्येक उमेदवाराला कोविड सुरक्षा किट देण्यात येईल. सेफ्टी किटमध्ये फेस मास्क, फेस शील्ड आणि पाच सेनिटायझर्स असतील. उमेदवारांना फेस मास्क आणि शील्ड घालून परीक्षा द्यावी लागणार आहे.