Maharashtra Board 12th Result Declared: यंदा बारावीचा निकाल घसरला, 91.25% विद्यार्थी उत्तीर्ण; दुपारी 2 वाजता mahresult.nic.in वर पहा गुणपत्रिका!

या लेखी परीक्षेमध्ये 12 लाख 92 हजार 468 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

HSC Result 2023| File Image

MSBSHSE 12th Results 2023: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या निकालाची (HSC Result) आज (25 मे) घोषणा झाली आहे. शरद गोसावी यांनी निकालाची आकडेवारी दिली आहे.  या परीक्षेचा राज्याचा निकाल 91.25 % लागला आहे. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला आहे. कोकण विभागाचा निकाल 96.01 % लागला आहे. यंदा देखील बोर्डाच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारलेली पहायला मिळाली आहे. सर्वात कमी निकाल मुंबई विभागीय मंडळाचा लागला आहे. दरम्यान मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या 12वीच्या निकालामध्ये घट झालेली पहायला मिळाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालाची टक्केवारी 2.97 टक्क्यांनी घसरली. गेल्यावर्षी 94.22 टक्के निकाल लागला होता. यावर्षी  12 वी चा निकालाचा टक्का घसरून यंदा तो  91.25 टक्के लागला आहे. Maharashtra Board 12th HSC Result 2023: बारावीचा निकाल आज दुपारी 2 वाजता पहा mahresult.nic.in वर.

शाखानिहाय निकाल किती टक्के?

विज्ञान – 96.09 टक्के

वाणिज्य – 90.42 टक्के

कला – 84.05 टक्के

विभागानुसार निकालाची टक्केवारी

कोकण 96.01 टक्के

पुणे 93.34 टक्के

कोल्हापूर 93.28 टक्के

औरंगाबाद 91.85 टक्के

नागपूर 90.35 टक्के

अमरावती 92.75 टक्के

नाशिक 91.66 टक्के

लातूर 90.37 टक्के

मुंबई 88.13 टक्के

कोकण बोर्ड मध्ये 23 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे.

बोर्डाने आता केवळ निकालाची आकडेवारी जाहीर केली आहे. यामध्ये विभागनुसार आणि शाखेनुसार आकडेवारी जाहीर करण्यात आलीआहे. विद्यार्थ्यांना त्यांचे विषयानुसार मार्क्स दुपारी 2 वाजता शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहेत.

इतर बोर्डाचे निकाल लागल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य बोर्ड निकालाची विद्यार्थी, पालकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. आज बारावीचा निकाल लागल्यानंतर दहावीचा निकाल देखील पुढील 8-10 दिवसांत जाहीर होऊ शकतो त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांमध्येही धाकधूक वाढली आहे.