Medical Education in Hindi: आता चक्क हिंदीतून होणार MBBS चे शिक्षण; गृहमंत्री अमित शाह करणार पुस्तकांचे अनावरण
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गुरुवारी कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेताना सांगितले की, मातृभाषेचा अभिमान जागृत करण्याचा हा कार्यक्रम असून लोकांची मानसिकता बदलण्याची ही ऐतिहासिक घटना आहे.
मध्य प्रदेशात आता वैद्यकीय शिक्षण (Medical Education) हिंदीतून होणार आहे. वैद्यकीय शिक्षण हिंदीमध्ये उपलब्ध करून देणे हा मध्य प्रदेश सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 16 ऑक्टोबर रोजी भोपाळ येथे एका कार्यक्रमात वैद्यकीय शिक्षण हिंदीतून देण्यास सुरुवात करणार आहेत. एका ज्येष्ठ मंत्र्याने शुक्रवारी ही माहिती दिली. मध्य प्रदेशचे वैद्यकीय शिक्षण मंत्री विश्वास सारंग यांनी सांगितले की, केंद्रीय गृहमंत्री मोतीलाल नेहरू स्टेडियमवर एका कार्यक्रमादरम्यान वैद्यकीय शिक्षणाच्या हिंदी अभ्यासक्रमाच्या पुस्तकाचे अनावरण करतील.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गुरुवारी कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेताना सांगितले की, मातृभाषेचा अभिमान जागृत करण्याचा हा कार्यक्रम असून लोकांची मानसिकता बदलण्याची ही ऐतिहासिक घटना आहे. विशिष्ट विषय केवळ इंग्रजीतच नव्हे तर हिंदीतही शिकवता येतात हे सिद्ध करण्यासाठी हे उदाहरण ठरेल, असे ते म्हणाले.
सीएम चौहान पुढे म्हणाले की, येत्या काही दिवसांत राज्यात वैद्यकीय शिक्षणाबरोबरच अभियांत्रिकी, नर्सिंग आणि पॅरामेडिकल अभ्यासक्रमही हिंदीतून शिकवले जाणार आहेत. लोकांची भाषेबद्दलची मानसिकता बदलण्याचा उद्देश असल्याने या कार्यक्रमात जास्तीत जास्त लोकांचा विशेषत: हिंदी तज्ञांचा सहभाग सुनिश्चित करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. (हेही वाचा: फ्रेशर्सना दिलेले ऑफर लेटर Wipro, Infosys आणि Tech Mahindra कडून रद्द; मुलाखती घेऊन नोकरभरती थांबवली)
अभ्यासक्रमाविषयी माहिती देताना सारंग म्हणाले, "फिजियोलॉजी, बायोकेमिस्ट्री आणि अॅनाटॉमी या विषयांसाठीच्या पुस्तकांचा पहिला विभाग तयार झाला असून ही पुस्तके एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली जातील. एका तज्ज्ञांच्या पथकाने ही तीन विषयांची पुस्तके तयार केल्याचे त्यांनी सांगितले. या पुस्तकांचा दुसरा विभाग तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
या उपक्रमात मोलाचे योगदान देणारे सारंग म्हणाले, 'रक्तदाब, पाठीचा कणा, हृदय, किडनी, यकृत किंवा शरीरातील इतर महत्त्वाच्या अवयवांसारख्या तांत्रिक संज्ञा आणि त्यासंबंधित शब्द हिंदीमध्ये लिहिले गेले आहेत. हिंदीमध्ये एमबीबीएस शिकणारे विद्यार्थी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मागे पडू नयेत, अशा दृष्टीने आम्ही ही पुस्तके तयार केली आहेत. विद्यार्थी सर्व तांत्रिक आणि वैद्यकीय संज्ञा इंग्रजीसह हिंदीतही शिकतील.’ पहिल्या वर्षी फक्त तीनच विषय (फिजिओलॉजी, अॅनाटॉमी आणि बायोकेमिस्ट्री) विद्यार्थ्यांना प्रामुख्याने शिकवले जातात.