JEE Mains 2020 Exams: कोरोनाच्या सावटाखाली आजपासून देशभरात जेईई मुख्य परीक्षेला सुरूवात
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा परीक्षा पार पडणार असल्याने सेंटरवर दिली जाणारी मास्क विद्यार्थ्यांना घालणं बंधनकारक असेल.
JEE Mains 2020 Exam Guidelines: महाराष्ट्रासह देशभरात आज (1सप्टेंबर) पासून जेईई मेन्स परीक्षा (JEE Mains Exam) देण्यासाठी विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर पोहचणार आहेत. दरम्यान देशभरात वाढती रूग्णसंख्या पाहता ही परीक्षा पुढे ढकलण्यासाठी याचिका करण्यात आली होती मात्र सर्वोच्च न्यायालयाने परीक्षा पुढे ढकलण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे यंदा सुमारे लाखो विद्यार्थी कोरोनाच्या सावटाखाली परीक्षेला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. दरम्यान देशात आयआयटीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना जेईई मेन्स आणि त्यानंतर जेईई अॅडव्हान्स परीक्षा देणं आवश्यक आहे. यंदा 1 ते 6 सप्टेंबर दरम्यान ही परीक्षा आयोजित केली आहे.
JEE Mains Exam 2020 च्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा या गोष्टी
- आजपासून सुरू झालेल्या या जेईई मेन्स 2020 परीक्षा ही 2 सत्रामध्ये होणार आहे. सकाळी9 ते 12 आणि दुपारी 3 ते 6 या वेळेत ही परीक्षा होईल.
- सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळत जेईई ची परीक्षा पार पाडली जाणार असल्याने परीक्षाकेंद्र वाढवण्यात आली आहेत.
- परीक्षा केंद्रावर पोहचल्यावर विद्यार्थ्यांचे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे थर्मल स्क्रिनिंग केले जात आहे.
- मुंबई आणि आजूबाजूच्या शहरात राहणार्या किंवा परीक्षा केंद्रावर पोहचणार्या विद्यार्थ्यांना मुंबई लोकल वापरता येणार आहे. दरम्यान अॅडमीट कार्ड पाहून विद्यार्थी आणि त्याच्यासोबत पालक असा प्रवेश दिला जाईल. त्यासाठी नियमित रेल्वे तिकीट आकारले जाईल. JEE & NEET Exam 2020: जेईई व नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दिवशी Mumbai Local ने प्रवास करण्याची मुभा.
- विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहचताना अॅडमीट कार्ड, NTA च्या वेबसाईटवरून डाऊनलोड केलेला सेल्फ डिक्लरेशन फ़ॉर्म, सॅनिटायझर, सरकार मान्य ओळखपत्र, पारदर्शक पाण्याची बाटली, बॉल पेन इत्यादी सामान घेऊन जाणं आवश्यक आहे. इथे पहा सविस्तर गाईडलाईन्स.
दरम्यान विद्यार्थ्यांना मास्क घालणं बंधनकारक असेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा परीक्षा पार पडणार असल्याने सेंटरवर दिली जाणारी मास्क विद्यार्थ्यांना घालणं बंधनकारक असेल. या परीक्षेचा निकाल 10 सप्टेंबर पर्यंत हाती येणं अपेक्षित आहे.