International Women’s Day 2021: सरकारी कंपनी NTPC ची मोठी घोषणा; फक्त महिला अधिकाऱ्यांची होणार भरती, अर्ज फी माफ
अशा भरती मोहिमेमुळे एनटीपीसीमध्ये जेन्डर विविधता वाढेल. एनटीपीसी जेथे शक्य असेल तेथे लिंगभेद सुधारण्याचे काम करत आहे
सरकारी विद्युत कंपनी एनटीपीसीने (National Thermal Power Corporation) जागतिक महिला दिनाच्या (International Women’s Day 2021) एक दिवस आधी महिला अधिकाऱ्यांसाठी विशेष भरती मोहीम जाहीर केली आहे. यामध्ये केवळ महिला अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार एनटीपीसीच्या देशभरातील सर्व ऑपरेशन सेंटरवर ही मोहीम राबविली जाईल. विशेष म्हणजे 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन जगभर साजरा केला जातो, त्यानिमित्ताने एनटीपीसीने ही घोषणा केली आहे. एनटीपीसी लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठी एकात्मिक उर्जा कंपनी आहे.
कंपनीच्या निवेदनानुसार याद्वारे एनटीपीसी महिला शक्ती आणखी मजबूत करेल. अशा भरती मोहिमेमुळे एनटीपीसीमध्ये जेन्डर विविधता वाढेल. एनटीपीसी जेथे शक्य असेल तेथे लिंगभेद सुधारण्याचे काम करत आहे. एनटीपीसीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, अधिकाधिक महिला अर्जदारांना आकर्षित करण्यासाठी कंपनीकडून पुढाकार घेण्यात आला आहे. भरतीच्या वेळी महिला कर्मचाऱ्यांसाठी अर्ज फी पूर्णपणे माफ केली गेली आहे. महिला कर्मचार्यांना पाठिंबा देण्यासाठी एनटीपीसी मुलांच्या देखभालीसाठी पगारासोबत सुट्टी, प्रसूती रजा, विश्रांती रजा आणि स्पेशल चाइल्ड केयर लिव्ह ऑन अडॉप्शन ऑफ अ चाइल्ड/ डिलीव्हरिंग चाइल्ड फॉर सरोगसी धोरणे पाळत आहे.
दुसरीकडे, एनटीपीसी लिमिटेडमध्ये सहाय्यक अभियंता आणि सहाय्यक केमिस्टच्या भरतीची प्रक्रिया आधीच सुरू आहे. या दोन्ही पदांच्या घोषित रिक्त जागांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार एनटीपीसीचे अधिकृत संकेतस्थळ ntpc.co.in वर किंवा कंपनीचे भरती पोर्टल, ntpccareers.net या संकेतस्थळावर दिलेल्या ऑनलाइन अर्जाद्वारे, 10 मार्च 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. (हेही वाचा: BOI Recruitment 2021: बँक ऑफ इंडियामध्ये नोकर भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रियेबद्दल अधिक)
दरम्यान, आज 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन जगभर साजरा केला जात आहे. हा दिवस प्रत्येक क्षेत्रातील महिलांच्या योगदानाचा आनंद साजरा करण्यासाठी आणि जगातील त्यांच्या सहभागास प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो.