Guidelines On Reopening Universities, Colleges: देशातील विद्यापीठे आणि महाविद्यालये सुरु करण्यासाठी UGC ने जारी केली मार्गदर्शक तत्वे; 50 टक्केच विद्यार्थी राहतील उपस्थित

आता लॉकडाऊननंतर युजीसीने (UGC) विद्यापीठे आणि महाविद्यालये (Universities and Colleges) पुन्हा उघडण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

Representational Image (Photo Credit: unsplash.com)

देशभरातील उच्च शैक्षणिक संस्था सुमारे 7 महिन्यांपासून बंद आहेत. आता लॉकडाऊननंतर युजीसीने (UGC) विद्यापीठे आणि महाविद्यालये (Universities and Colleges) पुन्हा उघडण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मात्र, कोणत्याही संस्थेत एकूण विद्यार्थ्यांपैकी 50 टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती असू नये असे सांगण्यात आले आहे. विज्ञान तंत्रज्ञान आणि संशोधन वगळता इतर सर्व कार्यक्रमांसाठी ऑनलाईन वर्ग सुरू राहतील. यूजीसीच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यार्थ्यांची इच्छा असल्यास ते वर्गात न येण्याऐवजी घरीच राहून ऑनलाइन अभ्यास करू शकतात. यासोबत मर्यादित संख्येने वसतिगृहे उघडता येतील असेही सांगितले आहे. वसतिगृहांच्या खोल्यांमध्ये एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना राहण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही.

कोणताही शैक्षणिक परिसर पुन्हा सुरू करण्यापूर्वी हे सुनिश्चित करणे गरजेचे आहे की, त्या संबंधित केंद्र किंवा राज्य सरकारने शैक्षणिक संस्था उघडण्यासाठी हा परिसर सुरक्षित घोषित केला आहे की नाही.

सर्व संशोधन अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आणि विज्ञान तंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाण्याची परवानगी मिळाली आहे. कारण त्यांची संख्या इतर कोर्सेसच्या विद्यार्थ्यांपेक्षा कमी आहे. यानंतर, संस्थेच्या प्रमुखांच्या सूचनेनुसार अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि प्लेसमेंटच्या उद्देशाने बोलविले जाऊ शकते.

कोरोना व्हायरस प्रसाराच्या दृष्टीने, राज्य व केंद्रशासित प्रदेश सरकारांशीही कंटेनमेंट झोनबाहेरील विद्यापीठे आणि महाविद्यालये उघडण्यासाठी सल्लामसलत केली आहे. राज्यशासित, केंद्रशासित प्रदेश यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर शिस्तबद्ध पद्धतीने देशभरात शैक्षणिक संस्था उघडल्या जाऊ शकतात. शैक्षणिक संस्था उघडण्यासाठी यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक असेल.

विद्यार्थ्यांना आणि स्टाफला कंटेनमेंट झोनमध्ये प्रवेश करू नये असा सल्ला देण्यात आला आहे. आरोग्य सेतु अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले पाहिजे. यूजीसीने म्हटले आहे की ज्या विद्यार्थ्यांना कोरोना संसर्गाची लक्षणे आहेत त्यांना कॅम्पसमध्ये राहण्याची परवानगी देऊ नये तसेच त्यांनी विद्यापीठात किंवा महाविद्यालयातील वसतिगृहांमध्ये शेअर रूममध्ये राहू नये. (हेही वाचा: भारतीय विमान कंपन्यांना 24 फेब्रुवारी 2021 पर्यंत 60 टक्के देशांतर्गत उड्डाणे चालवण्यास परवानगी- Civil Aviation Ministry)

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सामाजिक अंतरासह सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल. आपापसात सहा फूट अंतर राखणे आवश्यक आहे व मास्क परिधान करणे अनिवार्य असेल. विद्यापीठे आणि महाविद्यालये कंटेनमेंट झोनच्या बाहेर असतील तरच त्यांना उघडण्याची परवानगी दिली जाऊ शकते. कंटेनमेंट झोनमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना महाविद्यालयात प्रवेश घेता येणार नाही.