जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी इयत्ता आकरावीच्या प्रवेशावेळीच ऑनलान अर्ज करा: बार्टी

बार्टीच्या निर्देशानंतर राज्य शिक्षण विभागाने राज्यातील जिल्ह्यातील संबंधीत सर्व खासगी अनुदानीत, विना अनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित महाविद्यालयांच्या प्राचार्य आणि मुख्याद्यापकांना जात प्रमाणपत्राबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ,पुणे | (Photo courtesy: barti.in)

इयत्ता बारावीनंतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) बंधनकारक करण्याचा निर्णय विद्यमान वर्षापासून घेण्यात आला. त्यामुळे जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांना बरीच धावाधाव करावी लागली. विद्यार्थी, पालकांच्या अडचणी समजून घेत बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute) म्हणजेच बार्टी ( BARTI) ने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इयत्ता दहावीनंतर विद्यार्थी जेव्हा महाविद्यालयात प्रवेश घेतो तेव्हाच विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज करावा, असे बार्टीने म्हटले आहे. तसेच, त्याबाबतच्या सूचना राज्य शिक्षण विभागालाही देण्यात आल्या आहेत.

या वर्षी इयत्ता बारावीनंतर अनेक विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला. मात्र, आयत्या वेळी त्यांना जात वैधता प्रमाणपत्रच उपलब्ध झाले नाही. परिणामी बहुतांश विद्यार्थ्यांना खुल्या वर्गातून प्रवेश घ्यावा लागला. दरम्यान, ही बाब विचारात घेऊन जात पडताळणीसाठी विद्यार्थी, उमेदवार यांनी अर्ज केल्यानंतर त्याची पडताळणी होऊन प्रमाणपत्र प्राप्त होण्यासाठी ३ महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. अनेकदा प्रमाणपत्र प्राप्त होण्यासाठी विलंब लागतो त्यामुळे हे प्रमाणपत्र संस्थेला सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना अडचणीचे ठरते. (हेही वाचा, गलेलठ्ठ पगार देणाऱ्या टॉप 7 कंपन्या; नोकरी करणाऱ्याची हमखास चांदी)

बार्टीच्या निर्देशानंतर राज्य शिक्षण विभागाने राज्यातील जिल्ह्यातील संबंधीत सर्व खासगी अनुदानीत, विना अनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित महाविद्यालयांच्या प्राचार्य आणि मुख्याद्यापकांना जात प्रमाणपत्राबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, जात प्रमाणपत्र मिळवताना होणारा विलंब टाळण्यासाठी अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती यांसह इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना इयत्ता १०वी नंतर महाविद्यालयीन प्रवेश (इयत्ता आकरावी) घेतल्यानंतर लगेच जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

बार्टीच्या सूचनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी झाल्यास इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल येण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले असेन.