MPSC Exam 2020: कोरोना व्हायरस परिस्थितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या; सुधारित वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येणार
महाराष्ट्र मंत्रिमंडळाला आज राज्य मुख्य सचिवांनी सांगितले की, सर्व राज्य लोकसेवा परीक्षा (MPSC) कोविड-19 साथीच्या आजारामुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
कोरोना विषाणूच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र शासनाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळाला आज राज्य मुख्य सचिवांनी सांगितले की, सर्व राज्य लोकसेवा परीक्षा (MPSC) कोविड-19 साथीच्या आजारामुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परीक्षांचे नवीन वेळापत्रक नंतर जाहीर केले जाईल, असे सांगितले आहेत. महाराष्ट्र मुख्यमंत्री कार्यालयाने याबाबत माहिती दिली आहे. सध्या देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ आहे. या पार्श्वभूमीवर, देशभरात जेईई आणि नीटच्या परीक्षा पुढे ढकलण्याची जोरदार मागणी केली जात आहे.
आता महाराष्ट्र सरकारने सर्व राज्य लोकसेवा परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशात होणाऱ्या परीक्षांबाबत आपले मत व्यक्त केले होते. ते म्हणाले, ‘आम्ही जूनमध्ये परीक्षा देण्यास तयार नव्हतो, तर हे संकट वाढले आहे, तर आम्ही परीक्षा कशा घेऊ शकतो?’ याआधीच्या निर्णयानुसार, यंदाची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्य सेवा मुख्य परीक्षा ही 20 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. ही परीक्षा यापूर्वीही दोन वेळा पुढे ढकलण्यात आली होती. (हेही वाचा: जेईई (मुख्य) परीक्षा 1 ते 6 सप्टेंबर दरम्यान, तर नीट (युजी) ची परीक्षा 13 सप्टेंबर रोजी आयोजित; NTA कडून परिपत्रक जारी)
एएनआय ट्वीट -
याआधी वेळापत्रकानुसार, ही परीक्षा 5 एप्रिल रोजी होणार होती. मात्र कोरोनाच्या संकटामुळे ही परीक्षा पुढे ढकलून 20 सप्टेंबर रोजी घेण्याचे निश्चित झाले. आता ही परीक्षा अजून पुढे ढकलली आहे. दरम्यान, जेईई आणि नीट या दोन्ही परीक्षा कोविड महामारीचे संकट व विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेत, काही महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात याव्यात अशी आग्रही मागणी धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे करावी अशी मागणी आज पत्राद्वारे सीएम उद्धव ठाकरे व अजित पवार यांच्याकडे केली आहे.