Edible Oil Price Cut: सर्वसामान्यांना दिलासा; खाद्यतेलांच्या किंमतींमध्ये मोठी कपात, जाणून घ्या नवे दर
सरकारने तेलाच्या किमती कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजाराचा प्रभाव कमी करण्यासाठी प्रयत्न केले आहेत आणि सूर्यफूल तेलाची उपलब्धता सुनिश्चित केली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून खाद्यतेलाच्या (Edible Oil) किमतीत मोठी वाढ झाली होती. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यानंतर लोकांच्या खिशावरील बोजा चांगलाच वाढला होता. सर्वसामान्यांच्या जेवणातील तेल कमी झाले होते. परंतु आता मदर डेअरीने (Mother Dairy) सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. कंपनीने खाद्यतेलाच्या दरात कपात केली आहे. मदर डेअरीच्या धारा (Dhara) या ब्रँडचे सर्व खाद्यतेलं स्वस्त झाली आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, विभागातील सर्व खाद्यतेलांची कमाल किंमत म्हणजेच एमआरपी 15 रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे. मोहरीचे तेल, सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेल यांसारख्या भारतामध्ये मुख्यतः वापरल्या जाणार्या खाद्यतेलांवर ही कपात करण्यात आली आहे.
खाद्यतेलाच्या किमती कमी करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ही कपात करण्यात आली आहे. सरकारने तेलाच्या किमती कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजाराचा प्रभाव कमी करण्यासाठी प्रयत्न केले आहेत आणि सूर्यफूल तेलाची उपलब्धता सुनिश्चित केली जात आहे. त्याअंतर्गत देशांतर्गत सूर्यफुलाचे उत्पादनही वाढविण्याचा प्रयत्न आहे. नवीन एमआरपीसह धाराचे तेल पुढील आठवड्यापर्यंत बाजारात येईल, असे मदर डेअरीने म्हटले आहे.
असे असतील नवे दर –
धारा मोहरीच्या तेलाची (एक लिटर पॉली पॅक) किंमत 208 रुपयांवरून 193 रुपये प्रति लीटर झाली आहे. धारा रिफाइंड सनफ्लॉवर ऑईल (एक लिटर पॉली पॅक) पूर्वी 235 रुपयांवरून आता 220 रुपये प्रति लिटरने विकले जाईल. धारा रिफाइंड सोयाबीन तेलाची (1 लिटर पॉली पॅक) किंमत 209 रुपयांवरून 194 रुपयांपर्यंत कमी केली जाईल. (हेही वाचा: फक्त गॅस सिलिंडरच नव्हे, आता तर नवीन गॅस कनेक्शन घेणेसुद्धा भलतेच मागले, जोडणीसाठी मोजावे लागणार अधिक पैसै; घ्या जाणून)
आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर गेल्या वर्षभरापासून चढेच आहेत. देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी भारत दरवर्षी सुमारे 13 दशलक्ष टन खाद्यतेल आयात करतो. खाद्यतेलासाठी देशाची आयात अवलंबित्व 60 टक्के आहे. पीटीआयच्या अहवालानुसार, मदर डेअरीचे 14 ऑक्टोबर 2021 पर्यंत दिल्ली-NCR मध्ये एकूण 1800 कन्झुमर टच पॉइंट होते. कंपनीच्या योजनेनुसार 2022-23 या आर्थिक वर्षात त्यांची संख्या 2500 पर्यंत वाढवायची आहे. मदर डेअरी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे.