Earthquake In Nepal: नेपाळमध्ये शुक्रवारी पहाटे 6.1 रिश्टर स्केलतीव्रतेचा भूकंप झाला असून बिहार, सिलिगुडी आणि भारतातील इतर शेजारच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. काठमांडूपासून पूर्वेला 65 किमी अंतरावर सिंधुपालचौक जिल्ह्यातील भैरवकुंड येथे भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती राष्ट्रीय भूकंप देखरेख व संशोधन केंद्राने दिली. नेपाळच्या मध्य आणि पूर्व भागात स्थानिक वेळेनुसार पहाटे 2 वाजून 51 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. बिहारची राजधानी पाटणासह नेपाळ, पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या अनेक भागात गुरुवारी पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले होते. भूकंपाची तीव्रता 5.5 रिश्टर स्केल होती आणि याचा केंद्रबिंदू नेपाळच्या बागमती प्रांतात होता. दरम्यान, भूकंपाच्या धक्क्यांमुळे किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. नेपाळ आणि भारतातील हिमालयीन प्रदेश भूकंपसंवेदनशील क्षेत्रात मोडतात, जिथे वारंवार सौम्य ते तीव्र भूकंप होतात.
पाहा, या भूकंपाचा परिणाम व्हिडिओमध्ये.
बिहारची राजधानी पाटण्यातही भूकंपाचे धक्के जाणवले. अनेकांनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून त्यात छताचे पंखे आणि इमारती हलतांना दिसत आहेत. सुमारे 35 सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र, मोठे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
आसाममध्ये भूकंपाचे धक्के
नेपाळ आणि बिहारसह आसाममधील मोरीगाव जिल्ह्यात पहाटे 2 वाजून 25 मिनिटांनी 5.0 रिश्टर स्केलतीव्रतेचा भूकंप झाला. आसाममधूनही कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त मिळालेले नाही. हा भूकंप मध्यम तीव्रतेचा होता. तज्ज्ञांच्या मते, ५.५ रिश्टर स्केलचा भूकंप मध्यम श्रेणीत येतो आणि भूकंपाच्या केंद्राभोवती किरकोळ परिणाम दिसून येऊ शकतात.