Delhi: कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊनदेखील दिल्लीतील AIIMS रुग्णालयातील 35 डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह
शुक्रवारी दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) येथील 35 डॉक्टरांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले आहे.
आज देशभरात कोरोना विषाणूची सर्वात जास्त प्रकरण आढळली. शुक्रवारी दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) येथील 35 डॉक्टरांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले आहे. संसर्ग झालेल्या सर्व डॉक्टरांनी कोरोना लसीचे (Corona Vaccine) दोन्ही डोस घेतले होते. गुरुवारी, दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयाच्या 37 डॉक्टरांना कोरोना संक्रमणाची पुष्टी झाली होती. सर गंगाराम रुग्णालयाचे 37 डॉक्टर कोविड पॉझिटिव्ह आढळल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. डी. एस. राणा यांच्याशी चर्चा केली.
एम्सने ओपीडीची ऑफलाइन नोंदणी थांबविल्यानंतर आता ठरलेली कामेही बंद करण्यात आली आहेत. केवळ आपत्कालीन परिस्थितीतचं रुग्णांच्या शस्त्रक्रिया केल्या जातील. गेल्या वर्षीदेखील एम्सने असा निर्णय घेतला होता. गुरुवारी एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या देखरेखीखाली झालेल्या बैठकीत डॉक्टरांनी दिल्लीतील परिस्थिती बिघडल्याचे सांगितले. दररोज हजारो लोकांना संसर्ग होत आहे. म्हणून पूर्व-निर्धारित ऑपरेशन अनिश्चित काळासाठी थांबविणे आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. (वाचा - Coronavirus in India: भारतात आज 1,31,968 नव्या कोविड रुग्णांची मोठी वाढ; 780 मृत्यू)
दरम्यान, शनिवारी एम्समधील ऑपरेशन थिएटर बंद ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. केवळ ज्या रुग्णांना जीवघेणा धोका आहे त्यांच्यावरचं शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या बैठकीनंतर व्यवस्थापनाने सर्व विभागांना यासंदर्भात आदेश जारी केला. दोन दिवसांपूर्वी एम्सने ऑफलाइन ओपीडी नोंदणीवर बंदी घातली होती.
दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत दिल्लीच्या सर गंगाराम हॉस्पिटलमधील 37 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले. त्यातील पाच डॉक्टरांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही आठवड्यांत दिल्लीत कोरोना विषाणूच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.